संग्रहित छायाचित्र
फोनवर शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी मिळून एका तरुणावर चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेसात वाजता बोरजाई नगर, मेदनकरवाडी येथे घडली.
धीरज शिवलिंग हाडवळे (वय 23, रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रीतेश सुनील चव्हाण (वय 21, रा. श्रीरामनगर, चाकण) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज हे त्यांच्या घरी असताना प्रीतेश याने फोनकरून त्यांना इमारतीच्या खाली बोलावले. तिथे प्रीतेश आणि त्याचा अल्पवयीन साथीदार होते. अल्पवयीन मुलाने धीरज यांना 'मला फोनवर शिवीगाळ का केली' असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. धीरज यांनी त्यास प्रतिकार केला असता मुलाने त्याच्या खिशातून चाकू काढून धीरज यांच्या पायावर मारला. यात धीरज हे गंभीर जखमी झाले. धीरज हे आरडाओरडा करू लागले असता त्यांचा भाऊ तिथे आला. दरम्यान, प्रीतेश आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.