संग्रहित छायाचित्र
कंपनीच्या परस्पर पार्ट बनवून त्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (२४ जून) दुपारी दोन वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथील जय भवानी प्रॉपर्टीज मधील एक्युरेट सेल्स येथे करण्यात आली. अवधेश रामुजागीर यादव (वय ३३, रा. नाणेकरवाडी, चाकण. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी साजिद अजगरअली अन्सारी (वय ३४, रा. मुंबई) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे यादव यांचे एक्युरेट सेल्स नावाचे दुकान आहे. त्यांनी दुकानात जे के फेनर इंडिया या कंपनीचे उत्पादन असलेले पॉली एफ ब्रांडचे विविध मॉडेलचे ८८ व्ही बेल्ट विक्रीसाठी ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून १२ हजार ९० रुपये किमतीचे बनावट बेल्ट जप्त केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.