हिंजवडी पोलीस स्टेशन
रोहत आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्याम मानव यांचा मुलगा पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील बावधन परिसरात असताना हा मेसेज आल्याने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी ॲक्ट नुसार मंगळवारी (दि. २४) सूर्यप्रताप नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज अलीकडे चर्चेत आले आहेत. बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री महाराज लोकांचं मन वाचू शकतात, असा दावा करतात. या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) सहअध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर आता श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्यात घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी आणि अश्लील भाषेतील मजकूर असल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले होते.
त्यानंतर श्याम मानव यांना असलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर श्याम मानव यांना तत्कालीन राज्य सरकारने सुरक्षा पुरविली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी आव्हान दिले होते. बागेश्वर बाबांनी त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवावी. आम्ही त्यांना ३० लाख रुपये देऊ, असं श्याम मानव म्हणाले होते. यानंतर बागेश्वर बाबा नागपुरातील कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून गेले होते.
त्यानंतर श्याम मानव यांना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. या फोननंतर एकच खळबळ उडाली. हा फोन आल्यावर नागपूर पोलिसांनी श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एवढ्यावर न थांबता धमकी देणाऱ्याने श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज करून ‘घरावर बॉम्ब फेकून जिवे मारण्याची’ धमकी दिली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गणेश खारगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेजमध्ये मुक्कामी असून त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘‘पुरोगामी विचार मांडणाऱ्यांचे खून झाले आहेत. माझं नाव त्या लिस्टमध्ये असल्याने मला सुरक्षा वाढवली. अशा धमक्या मला येतच असतात. मी धर्मावर कधी बोलत नाही, देवावर कधी बोलत नाही. धर्माच्या नावावर लुबाडणाऱ्या ढोंगी माणसांच्या विरोधात मी बोलतो, अशा अनेक लोकांचा मी भांडाफोड केला. धर्माच्या आड येऊन हे लोक हिंदुत्ववादी संघटनांना भडकवत असतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मातही अशी लोकं आहेत,,’’ असे परखड मत मानव यांनी व्यक्त केले.
‘‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा ही मागणी करणाऱ्यांमध्ये सनातनी आहेत. पोलिसांनी यांची चौकशी करावी. दाभोळकर यांच्या प्रकरणात चार्जशीट दाखल होत आहे. त्यामुळे हे सनातनी हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करत आहेत. लोकांना फसवणाऱ्यांना, ढोंगी माणसांना हे वाचवत आहेत का? आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर आले. धिरेंद्र महाराज यांच्यात दिव्यशक्ती आहे तर मग जोशीमठ का वाचवला नाही? अतिरेकी हल्ले का वाचवत नाही? यांना देशाच्या सीमेवर पाठवावे. गुप्तचर यंत्रणेसोबत त्यांना ठेवायला हवे,’’ असा टोलाही मानव यांनी लगावला.
कोण आहे बागेश्वर बाबा?
छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज हे कथावाचक आहेत. ते अचानक प्रसिद्धीझोतात आले आहेत. बागेश्वर बाबांचा जन्म बागेश्वर गढा गावात झाला होता. बागेश्वर बाबांनी बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी हळूहळू वडिलांबरोबर कथा वाचण्यास सुरुवात केली.
बागेश्वर बाबांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे. याच बालाजी मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. आजोबा सिद्धपुरुष होते. त्यांच्या तपश्चर्येमुळे आपल्याला भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा ते करतात. बागेश्वर बाबांनी असाही दावा केला आहे की, त्यांच्याकडे असलेल्या दैवीशक्तीमुळं ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. त्यांच्या याच दाव्यामुळे बागेश्वरधाममध्ये भक्तांची संख्या वाढली असल्याचा दावा बाबांकडून करण्यात येत आहे.
धमकीचा मेसेज आला तेव्हा मोबाईल पिंपरी-चिंचवडमधील बावधन परिसरात असल्याने पोलिसांनी तिकडे गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रार देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा मेसेज आला आहे.
- श्याम मानव, संस्थापक तथा सहअध्यक्ष, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.