पुणे: जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने २७ वर्षीय तरुणाचे डोके, छाती आणि हातावर वार करीत गंभीर जखमी केले. याबाबत फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश मादप्पा कांबळे (वय २७, रा. रविवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल खुळे (रा. दत्तवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१९ मे) पहाटे साडे तीनच्या सुमारास आरोपी खुळे आणि अली इराणी या तरूणादरम्यान भांडण झाले होते. फिर्यादी कांबळे आणि इराणी या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. खुळे याच्या मनात इराणीबद्दल राग होता. त्याला शोधत असताना बुधवार पेठेतील क्रांती चौकात त्याला फिर्यादी कांबळे दिसला. कांबळे त्याचा मित्र राज साठे याच्यासोबत तिथे होता. खुळे दुचाकीवरून कांबळे याच्या जवळ गेला. त्याने 'अली इराणीसोबत का फिरतोस?' अशी विचारणा कांबळे याच्याकडे केली. तसेच त्याची कॉलर पकडली. त्याने कांबळे याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्याने कांबळे याचे डोके, छाती आणि हातावर वार करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी त्याच्या दोन मित्रांसोबत घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत कांबळे शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेला. पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.