'माझा आवाज दोन खुर्च्या सोडूनही जाऊ शकतो', अजित पवारांनी त्या चर्चांना दिला पुर्णविराम

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Thu, 23 Jan 2025
  • 09:27 am
Ajit Pawar, Sharad Pawar, Ajit Pawar avoided sitting next to Sharad Pawar

Vasantdada SugarInstitute Ajit Pawar avoided sitting next to Sharad Pawar

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या आसनाची व्यवस्था शेजारी केली होती. मात्र, व्यासपीठावर अजित पवार आल्यानंतर आसन व्यवस्थेत बदल करण्यात आला. व्यासपीठावरील या बदलानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अनेक चर्चांना उधाण आलं. दरम्यान, माध्यमांनी या संदर्भात सवाल उपस्थित केला असता अजित पवारांनी मिश्किल टिपणी केली. 

 

 शरद पवार यांच्या बाजूला अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. हे आसन पहिल्यानंतर अजित पवारांनी संबधित अधिकार्‍यांना नावाची प्लेट बदलण्यास सांगितली आणि शरद पवार यांच्या बाजूला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची प्लेट ठेवण्यास सांगितली. त्यांच्या या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूला बसण्याचे टाळल्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान, अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले. 

 

कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी आसन व्यवस्थेवर भाष्य केलं. “सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं होतं. मी शरद पवारांशी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मधे बसवलं. मी तिथे असलो तरीही मला बोलता येत होतंच. माझा आवाज एवढा आहे की दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला माझा आवाज जाऊ शकतो. बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यामुळे त्यांना मी तो आदर दिला.” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. 

 

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Share this story

Latest