मांजरी गावात पाण्याचा प्रश्न बिकट
उन्हाळ्याची चाहूल लागताच मांजरी गावात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मांजरी गावातील झोपडपट्टी परिसर, मांजरी फार्म, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, मुंढवा रस्ता या भागातील नागरिकांना गेल्या महिन्यापासून पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिकांवर पाणी मिळण्यासाठी टॅंकरला हजारो रुपये मोजण्याची वेळ आहे.
महापालिकेत मांजरी गावाचा समावेश झाल्यानंतर गावात पाणी येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती, त्यानुसार महापालिकेने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु संपूर्ण गावात पाण्याचे जाळे निर्माण करण्यास अद्याप महापालिकेला यश आलेले नाही, तर ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तेथून नळ कनेक्शन घेणे सुरू केले आहे, परंतु अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा घसा कोरडा पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी नाही तिथे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नवीन वर्ष उजाडताच मांजरी गावात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारी महिन्यातच कूपनलिकांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याचेच पाणी मिळण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असताना वापरायच्या पाण्याचादेखील प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा जाणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. मांजरी गावातील वस्त्यांवर पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पाणी सोडले जात होते. मात्र आता ते बंद झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर पुरवला जात आहे. मात्र तोदेखील वेळेत येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मांजरीत पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली आहे. त्या टाकीत पाणी सोडले जात आहे.
पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही, मिळकतकर आकारणी मात्र जोरात
मांजरी गाव महापालिकेत समाविष्ट होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. तरीही महापालिकेला गावच्या पाण्याचे नियोजन करता आलेले नाही. मात्र मिळकतकर आकारणी जोरात सुरू केली होती. मांजरी गावात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न बिकट आहे. गावकऱ्यांच्या शेतातील विहिरी आणि शेताला सोडणाऱ्या बोरवेलमधून गावातील इतर नागरिक पाण्याचा वापर करत आहेत. महापालिकेत समावेश झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र महापालिका अद्याप पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२० टक्के पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव
महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या गावांमध्ये मांजरी गावाचादेखील समावेश आहे. मांजरी गावाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास अपयश आले आहे. असे असले तरीही गावांसह मांजरी गावात २० टक्के दराने पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. पाणी नाही तर कर का भरायचा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मांजरी गावात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गावाचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर तरी पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे पाण्याच्या पाईपलाईनची कामे सुरू आहेत. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा प्रश्न बिकट होत असतो. यंदा महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू झाल्याने काही अंशी दिलासा मिळेल. परंतु जो भाग कूपनलिकांवर अवलंबून आहे, त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. महापालिकेने वेळीच यावर मार्ग काढून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा.
- राजेंद्र साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती.