ड्रेनेज लाईन तुंबल्याने धानोरीत लक्ष्मीनगरमधील दुकानांत पाणी
अवनी अडिगा :
शहरात मंगळावारी पावसाने कहर केला. वडगावशेरी भागात सर्वांधिक पावसांची नोंद झाली. ढगफुटीसारखी परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. याचा मोठा फटका धानोरीतील लक्ष्मीनगर भागाला बसला. ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच रस्त्यालगतच्या दुकांना पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
धानोरी भागातील ड्रेनेज लाईन खूप जुन्या आहेत. त्यामुळे लाईन तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात. तसेच लक्ष्मीनगरसमोरील टेकडीवर दोन किलोमीटरवर लष्करी तलाव आहे. हा तलाव पावसात पूर्णपणे भरतो, त्यामुळे वरुन पाणी थेट रस्त्यावरुन वाहू लागते मुसळधार पाऊस सुरु झाला की धानोरी गावातून व आजूबाजूच्या परिसरात तलावाची पाणी येते. मंगळवारी असाच प्रकार घडला असून रस्त्याला नदीचे स्वरुप आले होते. यामुळे दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे, असे येथील दुकानदारांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
पाणी साचल्याने व्यवसाय ठप्प झाला. दुकानातील मालाचे नासाडी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ड्रेनेजलाईन तुंबल्याचे प्रकार सातत्याने होत आहे. याची तक्रार केल्यानंतर केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी केली जाते. मात्र, त्यापुढे काहीही होत नाही. ३० मिनिटे जरी पाऊस पडला तरी दुकानांमध्ये साडेचार फुटांपर्यंत पाणी येते. आम्ही आमचा व्यवसाय कुठे करायचा?, असा प्रश्न एका नागरिकांने उपस्थित केला आणि तो रडू लागला.
पायाभूत सुविधा आणि ड्रेनेज सुविधांच्या कामाकडे लक्ष दिले जात नाही. महापालिकेत आता प्रशासकराज असल्याने कोणाकडे तक्रार करावी ते समजत नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने न्याय कोणाकडे मागावा, असे प्रश्न पडला आहे. टेकडीवरील तलावाला पूर्वी पाईप जोडलेले होते. मात्र त्यानंतर आता पाईप शोधावे लागत आहेत. या टेकडीजवळ नवीन इमारती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा लोंढा एकमच येतो. त्यामुळे पाणी थेट दुकानात शिरते. पालिकेकडे याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता आम्ही आशा सोडून दिल्या आहेत, असा संताप एका दुकानदाराने व्यक्त केला.
महानगरपालिकेने तात्पुरते उपाय योजना केल्या होत्या. मात्र त्या फार काळ टिकल्या नाहीत. आम्ही भरलेल्या कराचे ४० कोटी रुपये खर्च करुन पालिकेने ड्रेनेज लाईन टाकल्या पण, त्या निरुपयोगी ठरल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे आमच्या ३ गाड्यांचे नुकसान झाले आहे. महापालिकेने आता यावरकायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.