सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहाला आज भारतीय कामगार सेनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नाव देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे अधिसभेमध्ये ज्योत्स्ना एकबोटे यांनी लेखी प्रस्ताव मांडून देखील कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव अधिसभेत मांडण्यात आला आहे. परंतु त्यावर कोणताही निर्णय कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी घेतला नाही. त्यामुळे अखेर गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पाठपुरावा करत असताना निष्क्रिय प्रशासनाला कंटाळून नाईलाजास्तव भारतीय कामगार सेनेने आज आक्रमक पाऊल उचलले व सभागृहाचे नामकरण केले. जर विद्यापीठ प्रशासनाकडून अथवा कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या आदेशाने बळाचा वापर करत नामफलक काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी हे जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, सचिव शिवाजी उत्तेकर, सेवक पतपेढीचे अध्यक्ष अशोक रानवडे, सचिव सुमित ढोरे पाटील, महीलाप्रमुख सुप्रिया बारणे व भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी सभासद बंधू भगिनी उपस्थित होते.