पुणे : बाणेर टेकडीवर फिरायला गेलेल्या कोरियन अभियंता तरुणाला चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१७ ) घडली. चोरट्यांनी अभियंता तरुणाला धमकाविले. तसेच त्याचा मोबाईल फोन हिसकावून नेला. याप्रकरणी बाणेर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अभियंता तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तळेगाव दाभाडे भागातील एका वाहन निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहेत. ते मूळचे कोरियातील आहेत. ते सध्या बालेवाडी भागात सहकाऱ्यांसोबत राहतात.
तक्रारदार अभियंता शनिवारी (१७ मे) सकाळी बाणेर परिसरातील टेकडीवर फिरायला गेले होते. त्या वेळी तिघांनी त्यांना अडवले आणि त्यांना धमकाविले. तसेच त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्याकडील ७२ हजारांचा मोबाइल फोन हिसकावून नेला. या घटनेनंतर घाबरलेल्या अभियंत्याने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणअयात येत आहे.
टेकड्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे
बाणेर टेकडी, हनुमान टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या. त्यानंतर बोपदेव घाटात एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. टेकड्यांच्या परिसरात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला होता. या निधीतून टेकड्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसाविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. टेकड्यांच्या परिसरात नियमित गस्त घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.