संग्रहित छायाचित्र
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत आयोजित तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानात होणार आहे. मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे. यापूर्वीची दोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.
सामंत म्हणाले, मराठी साहित्यात जागतिक स्तरावर योगदान देणारे साहित्यिक, लेखक मधु मंगेश कर्णिक आणि मराठीतून करिअरला सुरुवात करणारे अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यिकांना मराठी विश्व साहित्य संमेलनात आमंत्रित करण्यात येणार आहे . त्यांचा खर्च शासनामार्फत उचलण्यात येणार आहे. शिवाय मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि तरुण लेखक, कवींचा संमेलनामध्ये सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी जे करता येईल, त्या सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जातील. बालसाहित्यिकांपासून लोकसाहित्यिक यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्यामुळे या संमेलनाला महत्त्व आहे, असे सामंत यांनी नमूद केले.
गतवर्षी विश्व मराठी संमेलनात परदेशातील मराठी व्यक्तींना संमेलनात बोलावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या संमेलनात परदेशस्थ मराठी व्यक्तींच्या सहभागाबाबत सामंत यांनी सांगितले की, या व्यक्ती परदेशात राहत असल्या तरी आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत. त्यांना संमेलनात सहभागी होता यावे म्हणून गतवेळी प्रवासाचा खर्च देण्यात आला होता. यंदाही जगभरातील मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न असेल.