विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरत आहे. ही घसरण थांबवत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश गोसावी यांनी केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 8 Jun 2023
  • 12:43 am
विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान

विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान

डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वीकारली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरत आहे. ही घसरण थांबवत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश गोसावी यांनी केले आहे.

गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे बुधवारी डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वीकारली. यावेळी ते बोल्ट होते. 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुणे विद्यापीठाची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या रँकिंगमध्ये विद्यापीठाची गुणवत्ता ढासळल्याचे अधोरेखित झाले आहे. विद्यापीठाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान नव्या कुलगुरूंच्या समोर आहे. याशिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, रखडलेली प्राध्यपक भरती अशा किचकट विषयांनाही त्यांना सामोरे जावे लागणार आहे.    

सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर गेल्यावर्षी १८ मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर कुलगुरूपद रिक्त होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाचा प्रभार होता. त्यामुळे विद्यापीठाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात अडथळे येत होते. कुलगुरूंच्या निवड समितीने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे डॉ. सुरेश गोसावी, प्रा. संजय ढोले, प्रा. अविनाश कुंभार, प्रा. विजय फुलारी आणि प्रा. पराग काळकर या पाच नावांची शिफारस केली होती. त्यातून डॉ. गोसावी यांच्या नावाची घोषणा राज्यपाल बैस यांनी केली. त्यानंतर नवनियुक्त कुलगुरू डॉ. गोसावी यांनी राज्यपाल बैस यांची बुधवारी मुंबईत भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पुण्यात पदाची सूत्रे स्वीकारली.

डॉ. गोसावी यांना शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक कामाचा अनुभव आहे. मूळचे जळगाव जिल्ह्यातील (धामणगाव) असलेल्या डॉ. गोसावी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९६६ साली झाला. त्यांनी जळगाव मधील एन.एम. कॉलेजमधून १९८८ साली बी.एससीची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागामधून एम.एससी (इलेक्ट्रॉनिक सायन्स) पदवी मिळवली. याच विषयात त्यांनी १९९६ साली पी.एचडी केली. त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. तर, १९९८ ते २००० या कालावधीत त्यांनी अमेरिकेतून पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळवली. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संचालक म्हणून ते २०२० पासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्रान्स, किंग सौद युनिव्हर्सिटी-सौदी अरेबिया, जपानमधील टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे मानद प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

कुलगुरूंसमोरील आव्हान....

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरत आहे. सध्या विद्यापीठ देशातील सर्वच शैक्षणिक संस्थाच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर आणि विद्यापीठांच्या गटात १९ व्या स्थानी आहे. मागील वर्षी पुणे विद्यापीठ सर्वच संस्थांच्या गटात २५ व्या स्थानावर होते.

पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.  विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यावर भर दिला जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाईल. विद्यापीठाला पुढे नेण्यासाठी विविध योजना आखल्या असून, त्याच्या अमलबजावणीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहे .

- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest