संग्रहित छायाचित्र
पुण्यातील बोट क्लब रस्त्यावरील ‘कल्पतरू गार्डन्स को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड’ येथील सोसायटीच्या आवारातील पूर्ण वाढ झालेली १२ झाडे बेकायदेशीर रीतीने तोडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. झाडांच्या फक्त फांद्या छाटण्याची परवानगी असताना मुळापासून झाडे तोडल्याचा आरोप रहिवाशांनी पुणे महापालिकेकडे केला आहे.
बवेरिया मोटर्सच्या कार पार्किंगसाठी रविवारी (दि. १५) ही झाडे तोडली असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. पर्यावरणपूरक शहराच्या रक्षणासाठी ‘सीविक मिरर’ने 'ग्रीन पुणे' मोहिमेअंतर्गत हा मुद्दा पुढे आणला आहे. ‘कल्पतरू गार्डन्स को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड’च्या रहिवाशांनी महापालिकेकडे दिलेल्या तक्रारीनुसार, झाडे २० वर्षांहून अधिक जुनी तसेच पूर्ण वाढ झालेली होती. १५ जून रोजी ही झाडे तोडण्यात आली असून, त्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती.
‘‘या झाडांमुळे परिसराचे हरित संतुलन राखले जात होते. चांगली हवा मिळत होती. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत होता. अशा स्थितीत कोणतीही पूर्वकल्पना न देता केलेली ही कृती बेकायदेशीर असून, महापालिकेने याची चौकशी करावी. ही झाडे तोडण्यासाठी महापालिकेची परवानगी होती की नाही हे स्पष्ट करावे. नियम तोडले असल्यास कल्पतरू कंपनीवर दंड आकारण्यात यावा आणि झाडांची सक्तीने लागवड करण्याचे आदेश द्यावेत,’’ अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
कल्पतरू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत ओसवाल यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, "जमीन आमची असली, तरी ती बवेरिया मोटर्सला भाड्याने दिलेली आहे. ‘सीविक मिरर’ने हे प्रकरण समोर आणल्यावर मी त्यांच्या प्रतिनिधींशी बोललो आणि त्यांनी महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेतल्याचे सांगितले.’’ दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अमित सिंग यांनी माहिती दिली की, झाडे छाटण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करणारा केदार रानडे हा सोसायटीचा रहिवासी नाही, तर ओसवाल यांचा कर्मचारी आहे. "झाडांमुळे सोसायटीच्या संरचनेला धोका आहे, असे खोटे कारण देऊन झाडे तोडण्यात आली आहेत. कारण, बवेरिया मोटर्स येथे शोरूम उघडणार असून, झाडे त्यांना अडथळा ठरत होती," असा आरोप सिंग यांनी केला.
महापालिकेचे उद्यान निरीक्षक ज्ञानोबा बालवडकर यांनी स्पष्ट केले की, "बवेरिया मोटर्सने आठ झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी घेतली होती आणि त्यांनी त्यातील केवळ तीन झाडे छाटली आहेत. नियमभंग झालेला नाही." मात्र एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर आरोप केला की, "बालवडकर हे लाच घेऊन झाडे छाटण्याच्या नावाखाली झाडे तोडण्यास परवानगी देतात."
बवेरिया मोटर्सने आरोप फेटाळले
बवेरिया मोटर्सचे सुशील अग्रवाल यांनी म्हटले की, "आम्ही फक्त दोन झाडांची छाटणी केली असून महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेतली आहे. १२ झाडे तोडल्याचे आरोप खोटे व बनावट आहेत." या प्रकरणावर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.