साठ हजार पुणेकरांनी मोजले स्वच्छतेसाठी सव्वा तीन कोटी

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई आता गंभीरपणे हाती घेतली आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सव्वा तीन कोटींचा दंड वसूल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 29 Sep 2024
  • 11:05 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

घनकचरा विभागाने अस्वच्छतेचा मुद्दा घेतला गांभीर्याने, वर्षभराच्या कारवाईत दिले शिस्तीचे धडे

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे आदी कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई आता गंभीरपणे हाती घेतली आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सव्वा तीन कोटींचा दंड वसूल केला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या वर्षभरात ६० हजाराहून अधिक पुणेकरांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे आदी गोष्टींचा समावेश आहे. 

यासाठी १८० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई सुरू केली असल्याचे कदम यांनी सांगितले.

असा केला दंड वसूल

ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल १२२८ लोकांकडून १२ लाख ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ४७, ४५६ लोकांकडून १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले. 

सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ३९६६ जणांकडून ८ लाख ८ हजार ६४० रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १४२० लोकांकडून ८ लाख ९६ हजार रुपये वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल ३७६५ लोकांकडून ७ लाख ३० हजार रुपये वसूल करण्यात आले. घरगुती कचरा ‘स्वच्छ’  च्या लोकांना देण्यास नकार देणाऱ्या २०० लोकांकडून ४१५२० वसूल करण्यात आले. 

बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंदबाबत १४२ लोकांकडून ८ लाख ५५ हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या ६२७ लोकांकडून २३ लाख ७२ हजार ६५० वसूल करण्यात आले. ११०८ लोकांवर प्लास्टिक कारवाई करत ५६ लाख ५ हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण ६० हजार २२३ लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने ३ कोटी २४ लाख ३८ हजार ६८३ रुपये वसूल केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest