पुण्यात दिवसाढवळ्या बँकेतून लुटले लाखो रुपये, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा येथील इंडसइंड बँकेतून चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी केली आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे तब्बल २ लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास घडलेली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या प्रकरणी अक्षय गोटे (वय ३८, धंदा रियल इस्टेट, रा. अलकसा सोसायटी, महमदवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोंढवा पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय गोटे हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. जागेच्या व्यवहारातून अक्षय यांना २ लाख रुपये कमिशन भेटले होते. ते आज सकाळी पाऊने अकरा वाजल्याच्या सुमारास ही रोख रक्कम पत्नीच्या खात्यात भरण्यासाठी इंडसइंड बँकते आले होते. यावेळी चलन स्लीप भरत असताना अज्ञात चोरचा त्यांच्या जवळ आला. “मी बँकेतील कर्मचारी आहे, आम्हाला एटीएममध्ये पैसे भरावे लागणार आहेत, तुमची स्लिप लवकर भरा”, असे चोरट्याने अक्षय यांना सांगितले. बँकेतील कर्मचारी आहे, असा भास झाल्याने अक्षय यांनी चोरट्याच्या हातात पैसे दिले आणि अक्षय हे चलन स्लीप भरत होते.
मात्र, या दरम्यान चोरटा पैसे घेवून लंपास झाला. फिर्यादी अक्षय त्याला शोधण्यासाठी कॅश काऊंटरवर गेले. त्यानंतर बँकेत त्यांनी चौकशी केली. चौकशीनंतर अज्ञात चोरटा हा बँकेतील नसल्याचे अक्षय यांना समजले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अक्षय यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.