एकिकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुर्णविराम मिळत असतानाच शरद पवार यांनी थेट अजित पवार यांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता पेल्यातील वादळ ठरली असल्याचे बोलले जात होते. अशातच दोन्ही नेत्यांचा फोन संवाद झाल्याची माहिती मिळताच पुन्हा विलिनीकरणाच्या चर्चेंन उधाण आलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे हिरवा कंदील दाखवल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अशातच, अमोल मीटकरी यांनी एकत्र येण्याच्या चर्चा या सर्व अफवा असल्याचा दावा केला. त्यामुळे हे विलिनीकरणाचं उठलेलं वादळ पेल्यातच राहिलं. अशातच, पुणे दौऱ्यावर असताना शरद पवारांनी थेट अजित पवारांना फोन केल्याने अनेकांच्या भुवया उंचाल्या आहेत.
तो फोन राजकीय नव्हे तर...
पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी आज पुरंदर येथील शेतकरी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी त्यांची अडचण सांगितल्यानंतर शरद पवारांनी थेट पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना केला फोन करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली.
पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचा प्रश्न शेतकऱ्यांची चर्चा करुन मार्गी लावावा अशी मागणी पवारांनी अजित पवारांना केली. मिळालेल्या माहितीनुसार, पवारांनी अजित पवारांना फोन करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क न झाल्याने थेट त्यांनी अजित पवारांना फोन केला.
मागील आठवड्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठका पार पडल्या. मात्र, या बैठकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा केवळ पेल्यातील वादळच ठरल्या आहेत. दोन्ही पक्ष प्रत्यक्षात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत.