सग्रहीत छायाचित्र
पुणे : सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सेवानिवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड (वय 62, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांचे शनिवार, 17 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना सिंहगड किल्ल्यावर घडली.
राजकुमार गायकवाड हे आतकरवाडी मार्गे ट्रेकिंग करत गड चढत असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली आणि काही क्षणांतच ते बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांचे हृदयाचे ठोके मंदावले होते. त्यांच्या सोबत असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती वन विभागाचे समाधान पाटील यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला दिली. रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ अवघ्या सहा ते सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मदतीसाठी वन विभागाचे सुरक्षा रक्षक नितीन गोळे आणि संतोष पडेर यांनीही मदत केली. गंभीर स्थितीत असलेल्या गायकवाड यांना स्ट्रेचरवर रेस्क्यू व्हॅनमध्ये घालून मोरया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, ट्रेकिंगदरम्यान आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.