Advertisement

Pune | आसामच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध युवक काँग्रेसचे आंदोलन; पुतळा जाळण्याचा प्रयत्न, स्वारगेट येथे तीव्र निदर्शने…

हिमंता बिस्वा सरमा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

पुणे : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ स्वारगेट चौकात युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून प्रतीकात्मक ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलनात सहभागी झालेल्या युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ‘‘सरमा यांचे वक्तव्य केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण दलित समाजाच्या स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला आहे. हे भाजप आणि संघाच्या मनुवादी आणि प्रतिगामी विचारसरणीचे उदाहरण असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात द्वेष आणि विषमता पसरवली जात आहे,’’ असा आरोप युवक काँग्रेसने केला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, प्रदेश महासचिव महेश म्हेत्रे, दिलीपसिंह देशमुख, भूषण रानभरे, प्रदेश सचिव निखिल मलके, विश्वजित जाधव, प्रदीप मेहकरे, अविनाश साळुंखे, अर्थव सोनार, पुणे शहर युवक काँग्रेसचे अभिजित चव्हाण, उपाध्यक्ष सद्दाम शेख, कुणाल काळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पुष्कर आबनावे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस सचिव भूषण पाटोदकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दलित नेत्यावरील टिप्पणी भाजपची संस्कृती दर्शवणारी

पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे भाजपवर टीका करताना म्हणाले, ‘‘देशातील सर्वात ज्येष्ठ दलित नेत्याबद्दल भाजप मुख्यमंत्र्यांनी केलेली टिप्पणी ही भाजपची संस्कृती दर्शवते.’’ भ्रष्टाचाराच्या मुख्य विषयाला बगल देऊन दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. दलित समाजाचा अपमान आणि लोकशाहीविरोधी कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देत अशा घटनांविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे युवक काँग्रेसने म्हटले आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PCMC | हिशेब ठेवणाऱ्यांनीच टाकला पिंपरी-चिंचवडच्या तिजोरीवर दरोडा? बोगस उपसूचनांतून ५२ कोटींची खैरात...

Next Post

Pune | मार्व्हल लँडमार्क्स बिल्डरला ‘उच्च’ दणका; रेरा प्राधिकरणाचा 'तो' आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडूनही कायम...