संग्रहित छायाचित्र
पुणे : राज्याच्या गृह विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने शुक्रवारी बदल्या केल्या. पुणे शहर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलवकडे यांची मुंबईमध्ये गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. तर, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांची बदली पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे.
पुण्यातील दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची नागपूरला बदली झाली आहे. तर, नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे. तसेच, पुण्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. यासोबतच पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर येथे बदली झाली आहे. तर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक सारंग आवाड यांची पिंपरी चिंचवडला बदली करण्यात आली आहे.
सीआयडीचे उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांची पोलीस दळवळण, माहिती व तंत्रज्ञान, परिवहन विभागात बदली झाली आहे. मुंबईच्या वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त एम. रामकुमार यांची महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीमध्ये बदली झाली आहे. लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार मगर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे. बिनतारी पोलीस यंत्रणेचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.