संग्रहित छायाचित्र
पुणे: ढगफुटीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण होऊन स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा दावा करून पुणे महापालिकेने निसर्गालाच दोष देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी असमान स्वरूपात पाऊस पडल्याचे मान्य केले असले तरी फक्त वडगाव शेरीमध्येच ढगफुटीसदृश पाऊस पडल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याबाबत महापालिका जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या ४८ तासांत शहरात मुसळधार पाऊस झाला. परंतु त्यामुळे निर्माण झालेल्या अनियंत्रित पूरस्थितीचा दोष पुणे महापालिका हवामान विभागावर ढकलत आहे. परंतु पुराच्या अतिरिक्त पाण्याच्या तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक नाल्यांच्या सफाईअभावी ते तुंबल्याची जबाबदारी महापालिका अधिकारी घेत नाहीत. तसेच सांडपाणी निचरा यंत्रणांच्या (चेंबर) निकृष्ट कामांमुळेच पाणी तुंबत असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहेत. वारंवार होणाऱ्या पूरस्थितीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय आणि कुचंबणा होत असताना पुणे महापालिका मात्र दोषारोपांचे खेळ खेळण्यात व्यग्र आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी (दि. १८) सिंहगड रस्ता, धायरी, कर्वेनगर, कोथरूड, हडपसर, लुल्लानगर, बाजार समिती (मार्केट यार्ड), बिबवेवाडी, कात्रज, घोरपडी आदी भागात वाहने गुडघाभर पाण्यात अडकली होती. सोपान बाग, बी. टी. कवडे रस्ता आणि येरवडा, चंदननगर आणि खराडी येथेही मुसळधार पाऊस झाला.
नदीकाठची विकासकामे आत्मघाती बॉम्बच : सारंग यादवाडकर
पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी सांगितले, ‘‘पूर येण्यामागील मुख्य कारण नदीकाठची पर्यावरणास हानिकारक विकासकामे (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट-आरएफडी) आहे. पूर ही नैसर्गिक घटना आहे तसेच या काळात धरणांमधून सोडले जाणारे पाणीही अनपेक्षित घटना ठरत नाही. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात कोणतेही अडथळे न आणता तिने मुक्तपणे वाहणे अपेक्षित आहे. मात्र, पूरक्षेत्रावर अतिक्रमण, राडारोडा टाकल्याने नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारच्या पर्यावरणीय मंजुरीविनाच पुणे महापालिका ही नदीकाठची विकासकामे राबवत आहे. हा विकासकामांचा प्रकल्प (आरएफडी) सर्वंकष विकास आराखड्यानुसार (डीपीआर) पूरनियंत्रणासंदर्भातील प्रकल्प अजिबात नाही. विकास आराखड्याच्या पूरविषयक अहवालानुसार या आरएफडी प्रकल्पानंतर पुण्यातील पूरपातळीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता नमूद केली आहे.’’
महापालिकेकडून मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष : विवेक वेलणकर
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले की, मूलभूत संरचनेतील तपशीलवार बाबींकडे महापालिकेने बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कारण या प्रकल्पांच्या मूळ आराखड्यातच खूप ढोबळ आणि मूलभूत चुका आहेत. पूर टाळण्यासाठी पाण्याचा त्वरित निचरा करण्यासाठीच्या व्यवस्थेच्या (पॉटहोल) दर्जेदार कामांपासून नदीच्या नैसर्गिक प्रवाहात कोणतेही अडथळे न आणण्यापर्यंत कुठल्याही बाबतीत महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत. ड्रेनेज आणि रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पूरनियंत्रणासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरा : शैलजा देशपांडे
हवामान बदलावर आपले नियंत्रण नाही. परंतु पुणे महापालिकेने त्यावर प्रभावी उपाययोजना अवलंबणे अत्यावश्यक आहे. संभाव्य पूरस्थितीची शास्त्रशुद्ध स्थळनिश्चिती (मॅपिंग) करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. पुराचे पाणी जमिनीत जिरवून भूजलपातळी वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पुण्यात पूर्वी सखल भाग जलमय व्हायचा आणि त्यासाठी महापालिका यंत्रणेची सुसज्ज तयारी असायची, पण आता थोड्या मुसळधार पावसातच संपूर्ण शहर जलमय होत आहे. आपण सदैव हवामानाला दोष देऊन चालणार नाही. त्यापेक्षा या पूरस्थितीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी, ही स्थिती समर्थपणे हाताळण्यासाठी आधुनिक उपाय आपण शोधून काढू शकतो, असे ‘लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन’च्या संचालिका शैलजा देशपांडे यांनी सुचवले.
पूर येण्याची अनेक कारणे : कनीज सुखरानी
‘नगर रोड सिटिझन्स फोरम संघटने’चे निमंत्रक कनीज सुखरानी म्हणाले, “शहरात पूर येण्याची अनेक कारणे आहेत. या पावसामुळे पुण्यात हाहाकार उडत आहे. मोठे नुकसानही होत आहे. मात्र, अनियंत्रितपणे राडारोडा टाकणे, सांडपाणी निचऱ्यासाठी करावयाच्या नियमित साफसफाईकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. मुसळधार पावसामुळे शहरातील मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे आणि अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. आता तरी महापालिका यंत्रणेने जागे होऊन या संकटावर प्रभावी उपाय शोधले पाहिजे.
ढगफुटीमुळेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर; महापालिकेचा दावा
पुणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने म्हणाले, “महापालिका यंत्रणेकडून शहरात पावसानंतर नेहमी पाणी साचण्याची ठिकाणे निश्चित केली गेली आहेत, परंतु शहरात रविवारी हडपसर येथे ढगफुटी झाल्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. आम्ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. ३० मेपर्यंत आम्ही कनिष्ठ अभियंते आणि स्वयंसेवकांची पथके तयार केली आहे, जी अतिरिक्त पावसाच्या भागातील आपत्कालीन परिस्थिती हाताळत आहेत. रविवारी आमच्याकडे ड्रेनेज दुरुस्तीसंदर्भातील ३०-४० तक्रारी आल्या. आम्ही या संदर्भात प्रभाग कार्यालयांद्वारे नागरिकांच्या सतत संपर्कात आहोत.’’
१०० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस असल्यास ढगफुटी : हवामान विभाग
हवामानशास्त्र विभागाच्या हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, ‘‘रविवारी पुणे शहरात झालेल्या पावसाला सरसकट ढगफुटी म्हणता येणार नाही. कारण संपूर्ण शहरात अत्यंत असमान प्रमाणात पावसाची नोंद झाली. केवळ वडगाव शेरीमध्ये १०१.५ मिमी. पावसाची नोंद झाली होती, तिला ढगफुटीसदृश वृष्टी म्हणता येऊ शकते. शहराच्या अन्य भागात मुसळधार पाऊस झाला पण ती ढगफुटी म्हणता येणार नाही. जेव्हा १०० मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हाच त्याला ढगफुटी म्हणतात. त्यापेक्षा कमी पावसाला ढगफुटी म्हटले जात नाही.’’