संग्रहित छायाचित्र
पुणे: कोंढव्यातील गंगाधाम-शत्रुंजय रस्त्याचे काकडे वस्तीजवळील काम ठप्प झाले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतत होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे सतत मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात महापालिकेकडे ढीगभर तक्रारी करूनही यावर कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. येथील समस्या सुटण्याऐवजी अधिकच चिघळली आहे.
या परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने सुरू झालेले हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कार्यालये, शाळा आणि निवासी गृहप्रकल्प असलेल्या या भागातील रस्त्यावर मोठी रहदारी असते. शाळा, कार्यालये सुटल्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. एकेकाळी सुटसुटीत अन् सोयीच्या असलेल्या या रस्त्यावर सध्या सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना रोज अग्निदिव्याला सामोरे जावे लागत आहे.
येथील रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार अर्जांद्वारे वारंवार दाद मागून, या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे महापालिका प्रशासन कानाडोळा करत आहे. येथील कामात कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. दीर्घकाळ रेंगाळल्यामुळे ही समस्या आता तीव्र झाली आहे. मात्र, तक्रारदारांच्या सततच्या उपेक्षेमुळे महापालिकेविरुद्ध व्यापक नाराजी आणि जनक्षोभ निर्माण झाला आहे. रोजच भेडसावत असलेली ही समस्या सोडवण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. येथे होत असलेल्या कोंडीमुळे प्रवाशांना आपापल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यास विलंब तर होत आहेच, परंतु या भागातील आर्थिक उलाढालीवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. येथील दुकाने, व्यावसायिक आस्थापनांकडे ग्राहक वाहतूक समस्येमुळे कमी प्रमाणात जात आहेत. कोंडीला तोंड द्यावे लागू नये म्हणून या रस्त्याच्या परिसराकडे येण्यास ग्राहक टाळाटाळ करू लागले आहेत. व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. येथील शाळांना विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे ही समस्या कठीण बनली आहे.
कोंढव्यातील पीजीकेएम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता भिडे यांनी सांगितले की, आमच्या शाळेलगतच्या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
हा रस्ता अजून पूर्ण का झाला नाही, ही आमच्यासाठी मोठी चिंतेचीच बाब आहे. आमच्या शाळेत १४०० विद्यार्थी आहेत. रोजच त्यांच्या स्कूलव्हॅन या कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब होऊन मोठी गैरसोय होत आहे. त्यात शाळेच्या सीमाभिंतीजवळ काही जणांनी राडारोडा, कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. येथे काही दिवसांपूर्वी दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
एका किलोमीटरसाठी २० मिनिटे
गंगाधाम-शत्रुंजय रस्त्यावर वाहनचालक आपला जीव मुठीत धरून दररोज प्रवास करतात. या रस्त्यावरून जड वाहतुकीस प्रतिबंध आहे. परंतु अशा वाहनांना रोखण्यासाठी येथे एकही वाहतूक पोलीस हजर नसतो. पासलकर चौक ते श्रीजी लॉनपर्यंतचा हा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून रखडलेलाच आहे. त्यामुळे सर्व वाहतूक पीजीकेएम शाळेकडे आणि हनुमान चौकाकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळे सततची कोंडी आणि खराब रस्त्यामुळे अवघे एक किलोमीटरचे अंतर कापायला आम्हाला रोज २० मिनिटे वाया घालवावी लागतात.
- अतुल जैन, कोंढवा विकास फोरम सदस्य
महापालिका म्हणते, पावसामुळे काम ठप्प
पुणे महापालिकेचे रस्ता विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, हा रस्ता डांबरी आहे. आम्ही त्यावर खडीचा थर दिला आहे. मात्र सध्या होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र ओल आहे. हा थर नीट सुकल्याशिवाय आम्ही त्याच्यावरील थराचे काम करू शकत नाही. अजून थरांचे आवश्यक काम बाकी आहे. पावसामुळे ते ठप्प झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर येत्या दोन-तीन महिन्यांत हे काम पूर्ण करू.