जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मृतांना पुणेकरांकडून आदरांजली
पुणे: पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला गुरुवारी १५ वर्षे पूर्ण झाली. या हल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना पुणेकरांनी कोरेगाव पार्क जर्मन बेकरी परिसरात एकत्रित येऊन आदरांजली वाहिली. मेरे अपने संस्थेचे बाळासाहेब रुणवाल तसेच शबनम खान यांनी आज एकदिवसीय उपोषण करत या भ्याड हल्याचा निषेध केला.
१३ फेब्रुवारी २०१० साली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या यासीन भटकळ, हिमायत बेग आदी दहशतवाद्यांनी पुण्यातील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला होता. तर, ५६ जण जखमी झाले होते. या वर्षी या हल्याला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एकदिवशीय उपोषण तसेच मौन ठेऊन निषेध करण्यात आला. हॅालंडच्या शूनयाम यांचे सहकारी या हल्ल्यात मरण पावले होते. त्यांच्या हस्ते सकाळी पुष्पांजली अर्पण करून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. कोरेगावपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन रुणवाल तसेच खान यांनी उपोषण सोडले.
गेली १४ वर्षे अविरतपणे पुणेकरांकडून हल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळेत उपस्थित राहून या दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त करावा, असे आवाहन रुणवाल, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, दलित सेना संस्थेचे अध्यक्ष सुनील यादव, डॉ. मानसी जाधव, जर्मन बेकरीच्या स्नेहल खरोसे यांच्यावतीने करण्यात आले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत, अनेक पुणेकरांनी दिवसभर जर्मन बेकरी परिसरात भेट देऊन मृतांना आदरांजली वाहिली. यावेळी सुजित यादव, हरीश काकडे, पोहाज शेख, जनार्दन जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.