राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि पुण्याला चांगलेच झोडले आहे. मुसळधार पावसामुळं पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं दिसून आलं. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे शरहातील अनेक भाग जलमय झाले. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी घेऊन येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ होत आहे. मंगळवारी (दि. २०) जोरदार पाऊस पडला. अनेक भागात नाले, चेंबर तुंबले होते. त्यामुळे रस्त्यावर पाणीचपाणी झाले. रात्री, साडेसातनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अक्षरशः काही भागांमध्ये दुचाकी पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळं नागरिकांनी महापालिका प्रशसनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची कामे केली जातात. मात्र, ती होत नाहीत. त्यामुळं मान्सूनपूर्व पावसातच पुणे महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. अशातच, या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजेंद्र मोरे यांनी मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन केलं. महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ हे होडी आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनामुळं प्रशासन गडबडून गेलं आहे.
पालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची कामे केली जातात. त्याअंतर्गत कल्व्हर्ट्स बांधणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, रस्त्यावरचे खड्डे बुजविणे, ड्रेनेजची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात जिथे पाणी शिरते, अशा धोकादायक ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन आदी कामांचे नियोजन केले जाते. त्यासाठी बजेटमध्येही तरतूद केली जाते. मेअखेरपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, ती होत नाहीत. त्यामुळं राजकीय नेत्यांसह नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.