Advertisement

Pune | ‘पीएमआरडीए’ची घरांची लॉटरी; १०२९ कुटुंबांचे ‘स्वप्न’ साकार…

लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू; मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक प्रक्रिया; यशस्वी लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांकडून अभिनंदन

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एकूण १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८ एप्रिल) अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. मानवरहित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रक्रियेतून स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थित अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृहातील वातावरण भावूक झाले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता आणि सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते ही बहुप्रतिक्षित सोडत काढण्यात आली. यावेळी यशस्वी लाभार्थ्यांना महानगर आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. अचूक व दर्जेदार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, ज्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे, त्यांना कर्जप्रकरणे व इतर कार्यालयीन बाबींसाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने सर्वतोपरी सहाय्य करावे, असे ते म्हणाले. हक्काचे घर मिळूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही स्वप्न अपूर्ण राहू नये, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही संपूर्ण प्रक्रिया ‘ओव्हरसाईट कमिटी’च्या कडक निगराणीखाली पार पडली. यामध्ये सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी दीपक नलावडे, सेवानिवृत्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धनंजय कुलकर्णी आणि सेवानिवृत्त मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी प्रत्यक्ष कामकाज पाहिले, तर मुंबई ‘म्हाडा’च्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रक्रियेवर लक्ष ठेवले.

ज्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून एसएमएसद्वारे यूट्यूब लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहआयुक्त पूनम मेहता यांनी करून सोडत प्रक्रियेची माहिती दिली व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. सूत्रसंचालन सहाय्यक लेखाधिकारी पूनम बोराटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपायुक्त हिम्मत खराडे यांनी मानले. या सोहळ्यास वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अधीक्षक भूमिअभिलेख आशा जाधव, तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह ‘पीएमआरडीए’चे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोडतीमध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) अशा दोन्ही गटांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. पेठ क्र. १२ मधील ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ५२, अनुसूचित जाती १३, अनुसूचित जमाती ८, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती २ आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील ३ सदनिकांसाठी विजेते निश्चित झाले. याच पेठेत अल्प उत्पन्न गटामध्ये (LIG) सर्वसाधारण २१७, अनुसूचित जाती ३३, अनुसूचित जमाती २०, विमुक्त जाती १०, भटक्या जमाती २ आणि अपंग प्रवर्गातील १६ लाभार्थ्यांना घरे मिळाली. दुसरीकडे, पेठ क्र. ३०-३२ च्या ईडब्ल्यूएस गटामध्ये सर्वसाधारण २३७, अनुसूचित जाती ३७, अनुसूचित जमाती ७, विमुक्त जाती ३, भटक्या जमाती ५ आणि अपंग प्रवर्गातील ५ लाभार्थ्यांची निवड झाली. तर याच पेठेत एलआयजी गटामध्ये सर्वसाधारण १५१, अनुसूचित जाती २९, अनुसूचित जमाती ३, विमुक्त जाती ४ आणि अपंग प्रवर्गातील ११ लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. या यशस्वी लाभार्थ्यांची आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या लाभार्थ्यांना ‘एसएमएस’देखील पाठवण्यात आले आहेत.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Chhatrapati Sambhajinagar | सरकारी कागदपत्रांवर अजूनही औरंगाबाद असा उल्लेख; पुरावा देत अंबादास दानवेंनी समोर आणला शासकीय दुटप्पीपणा...

Next Post

Cyber ​​fraud in Pune | पुण्यात सायबर फसवणूक सुसाट; चार वेगवेगळ्या घटना, १५ लाखांहून अधिक रक्कम लंपास...