पुणे : नदीपात्रात अडकलेल्या एका युवकाला अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. हा युवक शहरातील एका महाविद्यालयात शिकत आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी डीपी रस्त्यावरील पंडित फार्मजवळ ही घटना घडली. वेदांत कुलकर्णी (वय २०) असे या घटनेत बचावलेल्या युवकाचे नाव आहे. तो शहरातील एरंडवणे भागात राहतो. तो मूळचा अहिल्यानगरचा आहे.
डीपी रस्त्यावरील पंडीत फार्मजवळ मुठा नदीपात्रात एक तरुण अडकला असून, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्राला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख राजेश जगताप आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याला वेग आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे युवक नदीपात्रातील एक कठड्याला धरून थांबला होता. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. दोरीचा वापर करुन नदीपात्रात अडकलेल्या युवकाची दहा मिनिटांत सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
वेदांत हा मूळचा अहिल्यानगरचा असून पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. त्याचे मामा एरंडवणे भागात राहायला आहेत. सध्या तो मामाकडे राहतो. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेची माहिती युवकाच्या मामाला कळविण्यात आली. युवकाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी युवकाच्या मामाची चौकशी केली. तेव्हा गेल्या काही दिवसांपासून युवक मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते, असे मामाने पोलिसांना सांगितले, असे अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले.
"पंडीत फार्म परिसरातील रहिवाशांनी या घटनेची माहिती त्वरीत अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. त्यामुळे युवकाला तातडीने मदत उपलब्ध झाली. वेळेत मदत उपलब्ध झाली नसती, तर युवक प्रवाहात वाहून गेला असता."
- सुनीता रोकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक