उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान
बारामती : महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध आहे. महिलांचे सन्मान आणि प्रगती ही सामाजिक जबाबदारी असण्यासोबतच महाराष्ट्राचा समृद्ध भविष्याचा पाया आहे, असे प्रतिपादन (दि.१५) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज धनादेश प्रदान कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिजन्मशताब्दीवर्ष, कोल्हापूर करवीर संस्थानच्या संस्थापक छत्रपती रणरागिणी महाराणी ताराबाई ३५० वा त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष असून यानिमित्ताने राज्य शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरवशाली अध्याय असून हा गौरव जपण्यासोबतच वाढविण्याचे काम करावे. महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊमाँसाहेब, छत्रपती महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा असून त्यांनी कृतीतून दिलेल्या वाटेवरच वाटचाल करायची आहे, त्यांच्या कार्याचा वारसा जपत पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा.
पुढे ते म्हणाले की, देशाला आत्मनिर्भर करतांना महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, याकरीता राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाकरीता विविध लोककल्याणकारी, क्रांतिकारी निर्णय, उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये स्वतंत्र महिला धोरण, वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क, शासकीय सेवेत ३३ टक्के राखीव जागा, स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण, एसटी बस भाड्यात ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षणदेण्यासोबतच उच्च व तांत्रिक शिक्षण मोफत यांच्यासह राज्यात ७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात महिला बचतगटांना ४ कोटीहून कर्ज वाटप..
या वर्षी बारामती तालुक्यातील बचत गटांना सुमारे ३ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून १ कोटीहून अधिक रुपयांच्या कर्ज मंजूरी आदेश वाटप करण्यात येत आहे, ही रक्कम नसून नव्या प्रवाशाची सुरुवात आहे, घराघरामध्ये नवीन उद्योग उभारण्यास हातभार लागणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ मिळणार असून पाल्यांना शिक्षण, कुटुंबाला स्थर्य पर्यायाने गावाची समृद्धी होण्यास मदत होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.