संदीपसिंग गिल
पुणे : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सोमवारी (१९ मे) पदभार स्वीकारणार आहेत. पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले गिल सध्या परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त होते. याआधीच त्यांची ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्तीची शिफारस झाली होती, परंतु तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्यामुळे ही नेमणूक पुढे ढकलण्यात आली होती.
देशमुख यांनी त्यांच्या मुदतपूर्व बदलीविरोधात प्रशासकीय सेवा प्राधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. प्राधिकरणाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. मात्र, आता देशमुख यांची पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गिल यांच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गिल यांना पोलीस उपायुक्त पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. गिल १९ मे रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तर पुढील आदेश येईपर्यंत उपायुक्त निखिल पिंगळे हे परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
गणेशोत्सव, सार्वजनिक कार्यक्रम तसेच मध्यवर्ती शहर भागातील वाढती गुन्हेगारी यावर प्रभावी बंदोबस्त उभारण्यात संदीपसिंग गिल यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांशी सातत्याने समन्वय साधत जनतेत विश्वास निर्माण केला. तसेच, अल्पवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने उपक्रम राबवले. त्यामुळे ते एक लोकप्रिय अधिकारी ठरले होते.
संदीपसिंग गिल यांच्या नियोजनबद्ध, प्रभावी आणि लोकाभिमुख कामकाजामुळे पुणे ग्रामीण परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, आधुनिक तांत्रिक उपाययोजना राबवणे आणि नागरिकांशी अधिक संवाद साधणारे पोलिसिंग सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.