Pune | पुणे विद्यापीठाचे वसतिगृह ठरलेय ढेकणांचे माहेरघर, विद्यार्थ्यांची बाहेर झोपण्यास पसंती...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी विद्यार्थी वसतिगृहांतील ढेकणांच्या सुळसुळाटामुळे त्रासले आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे विद्यापीठाचे वसतिगृह ठरलेय ढेकणांचे माहेरघर

तातडीने उपाययोजना करण्याची विद्यार्थी संघटनांची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी विद्यार्थी वसतिगृहांतील ढेकणांच्या सुळसुळाटामुळे त्रासले आहेत. ढेकणांच्या त्रासाला कंटाळून काही विद्यार्थी वसतिगृहाच्या बाहेर झोपत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विद्यार्थी ढेकणांनी त्रस्त झाले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. मात्र, ढेकणांचा त्रास जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळत नाही. वसतिगृहातील स्वच्छतेच्या अभावामुळे ढेकूण वाढल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. ऐन परीक्षेच्या काळात  विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या इमारतीबाहेर झोपावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून याविषयी अनेकदा पाठपुरवा केला आहे. वसतिगृहातील ढेकणांबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तरी सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने याकडे नेहमी दुर्लक्ष केले, असा आरोप अभाविपचे प्रतिनिधी शिवा बारोळे यांनी केला आहे. याबाबत ‘सीविक मिरर’ने विद्यापीठाच्या मुख्य वसतिगृह अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वसतिगृहाबाहेर झोपण्याचा धोका परवडला, पण ढेकूण नको...

दिवसभर वर्गांमध्ये तसेच अभ्यासिकेत घालवून विद्यार्थी रात्री वसतीगृहाकडे येतात. मात्र अनेक विद्यार्थी ढेकणांच्या त्रासामुळे वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये झोपण्याऐवजी बाहेर मैदानावर खाट किंवा अंथरूण घालून झोपतात. वसतिगृहाच्या आजूबाजूला दाट झाडी आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी मैदानावर झोपणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, विद्यार्थी ढेकणांचा त्रास सहन करण्यापेक्षा बाहेर झोपण्याचा धोका पत्करताना दिसत आहेत.

"ढेकणांच्या त्रासाला कंटाळून वसतिगृहातील एका मित्राच्या खोलीत राहात आहे. ढेकूण चावल्याचा एक् व्हिडीओ बनवून वसतिगहाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच रेक्टरला पाठविला होता. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. ढेकूण चावल्यामुळे पायाला खाज सुटली होती. जास्त खाजवल्याने पायाला जखमा झाल्या होत्या. वसतिगृहाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामध्ये ढेकूण लपून बसतात."

- त्रस्त विद्यार्थी  

"विद्यार्थ्यांना झोपताना ढेकणांची भीती तर उठल्यावर परीक्षेची चिंता सतावत आहे. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील वास्तव विदारक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर हा सरळसरळ घाला आहे! ढेकणांचे चावे शरीराला, पण विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या मनाला जाळत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल."

- शिवा बारोळे, प्रतिनिधी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

Share this story

Latest