Pune | महापालिकेचे खासगीच गणित पक्के, विनानिविदा कामासाठी सव्वा कोटींच्या वर्गीकरणाचा घाट....

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटत असते. ही भीती घालवण्यासाठी शिक्षक विविध पद्धती वापरून गणित सोपे करून शिकवतात. मात्र, महापालिकेने स्वत:च्या शाळा आणि या शाळांमधील शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा निर्णय घेतला आहे.

Pune Municipal Corporation,

प्रातिनिधिक छायाचित्र....

विद्यार्थ्यांना पाढे शिकवण्यासाठी महापालिकेने घातल्या खासगी संस्थेसाठी पायघड्या...      

पुणे | शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटत असते. ही भीती घालवण्यासाठी शिक्षक विविध पद्धती वापरून गणित सोपे करून शिकवतात. मात्र, महापालिकेने स्वत:च्या शाळा आणि या शाळांमधील शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवी दरम्यानच्या मुलांना गणित शिकवण्यासाठी एका खासगी संस्थेकडून शैक्षणिक साहित्य खरेदी केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार नसून वर्गीकरणाद्वारे १ कोटी ३४ लाख ९९ हजार रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. एका माजी मंत्र्याच्या दबावाखाली पालिकेकडून खासगी संस्थेसाठी पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. 

शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

एका बाजूला गणित, विज्ञान सारख्या महत्त्वाच्या विषयांसाठीच्या कायमस्वरूपी शिक्षकांना हजारो रुपयांचे मासिक वेतन दिले जाते. त्यांच्याकडून शाळेत वेगवेगळे उपक्रमांद्वारे अशा विषयांचा अभ्यास पक्का करून घेणे अपेक्षित आहे. असे असताना शिक्षकांची जबाबदारी सोडून ती एका कंपनीच्या अॅपवर टाकून कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे एका प्रकारे महापालिकेकडून आपल्याच शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निर्मिती असलेल्या अंकनाद गणिताची सात्मिकरण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कंपनीचे संचालक मंदार त्र्यंबक नामजोशी, निर्मिती मंदार नामजोशी आणि पराग यशवंत गाडगीळ हे आहेत. यातील पराग गाडगीळ हे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स या कंपनीचेही संचालक आहेत. या कंपनीने विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती नाहीशी करून गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित केली आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत आकडेमोड करण्यास, तसेच सामान्य वाचन प्रक्रियेतही अडचण येत आहे. कोविड आपत्तीमध्ये या समस्येत भर पडली आहे. त्याचा सर्वंकष विचार करून ही प्रणाली विकसित करण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून महापालिकेच्या शाळांसाठी सीएसआर योजनेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम तसेच शैक्षणिक साहित्य घेता येऊ शकते. या कंपन्या तसेच सामाजिक संस्थांकडून महापालिकेच्या शाळांमध्ये संपर्क साधला जात असतो. मात्र, त्यांना शाळांमधून विरोध केला जात असल्याचे चित्र आहे. चांगले काम आणि मोफत काम करू इच्छिणाऱ्यांना प्रवेश नाकारत कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी होकार दर्शवला जात असल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे. त्यामुळे या प्रकरणावर संशय व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांकडून पाढे पाठ करून घेण्याच्या नादात कोणाचे पोट भरले जाणार आहे, असाही प्रश्न नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे. महापालिकेला कोणताही उपक्रम चालवायचा असल्यास त्यासाठी निविदा काढावी लागते. मात्र, निविदा प्रक्रिया न राबवता तसेच शासनातील एका माजी मंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चांगलीच चर्चा महापालिकेत रंगली आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंकनाद गणितासाठी प्रणाली विकसित केली आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर या कंपनीला हे काम दिले जाणार असल्याचे असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंकनाद गणितासाठी प्रणाली विकसित केली आहे. याबाबतची माहिती घेतली जात आहे. माहिती घेतल्यानंतर पुन्हा यावर बोलूयात, असे या कंपनीचे संचालक पराग गाडगीळ यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

काय आहे प्रस्ताव?

विद्यार्थ्यांचे गणित पक्के व्हावे यासाठी या कंपनीने पाढे पाठ करण्यास तसेच गणित विषय सोप्या पद्धतीने शिकण्यास मदत करणारे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. या साहित्यास एचसीआरटीने मान्यता दिली आहे. राज्यातील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यास हरकत नसल्याची शिफारसही केली आहे. त्यानुसार, शिक्षण मंडळास या शाळेने पत्र दिले होते. तसेच, राज्य शासनाच्या एका माजी मंत्र्यांकडेही याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडूनही महापालिकेस याबाबत पत्र प्राप्त झाले होते, असे शिक्षण विभागाने ठेवलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांच्या रकमेवर डोळा

या प्रणालीसाठीचे शैक्षणिक साहित्याचा दर प्रती ५० मुलांसाठी १५३ रुपये ४० पैसे आहे. त्यानुसार, पालिकेने १ ली ते  ८ वीच्या मुलांची संख्या अंदाजे ८८ हजार असून या सर्वांसाठी संच घेण्यासाठी १ कोटी ३४ लाख ९९ हजार २०० रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला आहे, तर या खर्चासाठी निधी नसल्याने हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून १० आणि १० मध्ये महापालिकेच्या शाळांमधील गुणवंत मुलांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून हा निधी वर्गीकरणाद्वारे दिला जाणार आहे.

गणित विषयाची भीती दूर होण्याचा दावा

पाढे लयबध्द संगीतमय पध्दतीने तयार केले असून, विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहतील अशा पध्दतीने याची रचना केली आहे. ही संपूर्ण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक असून याचा फायदा गणितीय सूत्रे, गणित सोपे होण्यासाठी तयार आहे. या प्रणालीमुळे त्यांची गणित विषयाची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्या शिक्षण शाखांचा पाया असलेला गणित विषयाच्या गुणवत्ता वाढीस हातभार लागेल, असा दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे. 

"विद्यार्थ्यांचे गणित पक्के व्हावे यासाठी एका संस्थेने पाढे पाठणारे साहित्य तयार केले आहे. या साहित्यास एचसीआरटीने मान्यता दिली असून राज्यातील काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्य सरकारने याबाबतचा शासन आदेश काढला. पुणे महापालिकेने केवळ या प्रकल्पासाठी वर्गीकरण करून आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव  ठेवला आहे. त्यानंतर खुल्या निविदा मागवल्या जातील, कोणा एका विशिष्ट कंपनीला अथवा संस्थेला हे टेंडर दिले जाणार नाही."

 - पृथ्वीराज बी.पी. (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)

Share this story

Latest