प्रातिनिधिक छायाचित्र...
Pune | अलीकडील पावसात निलायम सिनेमाजवळ आणि एरंडवणे परिसरात धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळून झालेल्या दोन दुर्दैवी मृत्यूनंतर अखेर पुणे महापालिका जागी झाली आहे. महापालिकेने नागरिकांचे ३०९ प्रलंबित अर्ज मंजूर करत शहरभर धोकादायक झाडांची छाटणी आणि तोडमोहीम गतीने सुरू केली आहे.
महापालिका अधिकारी म्हणाले की, खासगी सोसायट्यांच्या आवारातील धोकादायक झाडे अथवा फांद्या आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तोडण्यात येतील; मात्र त्याचा खर्च संबंधित सोसायटीकडून वसूल करण्यात येईल. गेल्या दोन महिन्यांत उद्यान विभागाने ७४८ ठिकाणी अशा धोकादायक झाडांवर कारवाई केली आहे, असा दावा करण्यात आला आहे. ही मोहीम महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर जोरात सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून विविध विभागामध्ये बैठका झाल्या, परंतु मृत्यूच्या घटनांपूर्वी कोणतीही ठोस कृती झाली नव्हती.
यापूर्वी धोकादायक झाडे तोडण्याच्या किंवा छाटण्याच्या परवानग्या फक्त ट्री अथॉरिटी कमिटीमार्फत दिल्या जात असत, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत होता. यामुळे अलीकडे हे अधिकार प्रादेशिक कार्यालयांतील समित्यांकडे सोपवले गेले, तरीही विलंबाच्या तक्रारी सुरूच होत्या. या दोन्ही मृत्यूनंतर वाढलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने ३०९ प्रलंबित अर्जांना मंजुरी देऊन कार्यवाही गतीने सुरू केली. महापालिकेच्या झाडे छाटणी वाहनाने ४३९ ठिकाणी काम पूर्ण केले आहे.
"महापालिका अधिकाऱ्यांना मान्सून काळात धोकादायक झाडांची आणि फांद्यांची ओळख करून ती तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी सोसायट्यांमध्येही गरज भासल्यास महापालिका कारवाई करेल, मात्र त्याचा खर्च संबंधित सोसायटीकडून वसूल केला जाईल."
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका