साहेब, नगररोड ओलांडायचा कसा?

पुणे शहरातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता सिग्नलमुक्त करण्यात आला आहे. परंतु, येरवडा ते खराडी जुना जकात चौकादरम्यान वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या सिग्नल फ्री आणि यू-टर्न संकल्पनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी फलकबाजी केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

‘चुकलेल्या यू-टर्नचा त्रास सहन का करायचा? कोणी वालीच नाही...’ नगररोडवरील यू-टर्न विरोधात फलकबाजी; नागरिकांचा संताप

पुणे शहरातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता सिग्नलमुक्त करण्यात आला आहे. परंतु, येरवडा ते खराडी जुना जकात चौकादरम्यान वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या सिग्नल फ्री आणि यू-टर्न संकल्पनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी फलकबाजी केली आहे.  ‘साहेब... नगररोड ओलांडायचा कसा?  चुकलेल्या यू-टर्नचा त्रास सहन का करायचा? कोणी वालीच नाही..." असे नमूद केलेले फलक लावत नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून नागरिकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.  

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्यावरील आठ सिग्नल बंद केले आहेत. या प्रयोगामुळे वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. परंतु, चौक बंद करून यू-टर्न घेण्यासाठी मोकळीक दिलेल्या ठिकाणांवर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचे कोणतेही उपाय केले नाहीत. रस्त्यावर पहिला हक्क असलेल्या पादचाऱ्यांना रस्त्यावर चालण्यासाठी साधी जागा शिल्लक ठेवलेली नाही, असा आरोप करीत या भागातील रहिवाशांनी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला. तसेच, यू-टर्न घेताना मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

शास्त्रीनगर चौक बंद करून आगाखान पॅलेससमोर, रामवाडी हयात चौक, मेट्रो स्टेशनसमोर, विमाननगर आणि सोमनाथनगर चौक, आगानगर हॉटेल उपालासमोर, टाटा गार्डरूम चौक, महानगर बँकेसमोर, खुळेवाडीफाटा, तसेच चंदननगर भुयारी चौक आणि चंदननगर बायपास चौक बंद करून थेट खराडी जुना जकात नाका येथे यू-टर्नची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रयोगामुळे रस्ते ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षित सोय करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ते ओलांडावे लागत आहेत. स्थानीय नागरिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महिला यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निर्णयामध्ये स्थानिक नागरिक व प्रतिनिधींना विश्वासात न घेता केवळ प्रयोग म्हणत घेतलेले हे पाऊल नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करणारे ठरले आहे, असा आरोप करून वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देवकर, अनिल गलांडे आणि करीम शेख यांनी 'नगररोड ओलांडायचा कसा?' असा प्रश्न उपस्थित करत यू-टर्नच्या ठिकाणी फलक लावून वाहतूक विभागाला जाब विचारला आहे.

प्रयोगामुळे वाहतुकीचा वेग वाढला : वाहतूक पोलीस

नगर रोडवर राबविण्यात येत असलेला प्रयोग हा उत्तम असून, यामुळे वाहतुकीचा वेग वाढला आहे. स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, याची जाणीव आहे. या रस्त्यावरील आठ सिग्नल बंद केले आहेत. यामुळे १५ मिनिटांचा वेळ वाचत आहे. यू-टर्न घेण्यात येणारी ठिकाणे निश्चित झाली असून त्याची सवय नागरिकांना पडली आहे. आता वाहतूक कोंडी होत नाही. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा पादचाऱ्यांनी वापर करावा. पादचाऱ्यांसाठी २० सेकंदाचा सिग्नल दिला आहे. महापालिकेला कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

वाहतूक कोंडी होत नसल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा

‘‘ नगर रस्ता सिग्नलमुक्त करून वाहतूक कोंडी होत नसल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, हा दावा चुकीचा आहे. रामवाडी ते शास्त्रीनगर चौकात जाण्यासाठी अर्धा तास लागला होता. वाहतूक कोंडी झाली म्हणून ११२ या क्रमांकावर फोन केला होता. फोनला तत्काळ प्रतिसाद दिला. परंतु वाहतूक कोंडी सुटली नाही. ती कधी सुटणार, हा प्रश्न आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे. या वाहतूक कोंडीमध्ये अनेकवेळा रुग्णावाहिका अडकलेल्या असतात. काही झाले तरी रुग्णावाहिकेसाठी वाट मोकळी होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा. पोलिसांची फोनसेवा चांगली आहे. पण त्याला कृतीची जोड असावी, असे उत्तर ११२ या क्रमांकावरून पुन्हा फोन आल्यावर दिले,’’ असा अनुभव एका माजी नगरसेवकाने ‘सीविक मिरर’ला सांगितला.

Share this story

Latest