पुणे महापालिकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या झाडकामासाठी नेमलेले ५०० हून अधिक कामगार राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर गुलामगिरी करतायत. असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत केला आहे. त्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी हे कामगार खासगी घरगडी बनलेत, आणि त्यांचा पगार मात्र जनतेच्या पैशातून होतोय. असे गंभीर आरोप करत कुंभार यांनी ही लूट थांबवा – नावं जाहीर करा, आणि या चोरांकडून पैसा वसूल करा! अशी मागणी केली आहे.
पुणे महापालिकेच्या झाडकामासाठी नेमलेल्या कंत्राटी कामगारांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत राजकीय नेत्यांकडून होत आहे. शहराच्या रस्त्यांवर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या या कामगारांचा वापर अनेक राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या वैयक्तिक घरकामासाठी करत असल्याचे उघड झाले आहे. सुमारे ५०० पेक्षा जास्त कामगार महापालिकेचा पगार घेऊन रस्त्यांवर काम करण्याऐवजी घरगडी म्हणून राजकीय नेत्यांची खासगी घरी काम करत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, एकूण १० हजार २२० झाडकाम कामगारांपैकी केवळ ५ हजार ४०६ कामगारच प्रत्यक्ष रस्त्यावर काम करतात. उर्वरित कामगारांना झाडकामाऐवजी अतिक्रमण हटवणे, सांडपाणी व्यवस्थापन, फ्लेक्स काढणे, यांसारख्या इतर विभागांमध्ये वापरले जात आहेत.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी जवळपास १५ कामगार कायस्वरुपी घरगडी म्हणून काम पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालययाच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका माजी नगरसेविकेच्या घरी काम करण्यास नकार दिल्याने एका कामगाराला थेट कामावरुन काढच घरी पाठवण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.
महापालिकेने झाडणकामासाठी नुकतीच १४७ कोटींची निविदा काढली होती. मात्र, ती वादग्रस्त ठरल्याने रद्द करण्यात आली. एकिकडे नव्या कंत्रासाठी कोट्यावधी रुपये पाण्यासारखा खर्च करण्यात येत आहेत तर दुसरीकडे आधीच असलेले कामागार दुसऱ्या कामात व्यस्त आहेत. या सर्व प्रकारामुळे शहराच्या रस्त्यांची सफाई वेळेवर होत नाही. कचरा उचलण्यात विलंब होत आहे.
आयुक्त साहेब, किती हा भोंगळ कारभार? पालिका आहे की वैयक्तिक नोकरखाना?
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) June 14, 2025
महापालिकेच्या झाडकामासाठी नेमलेले ५०० हून अधिक कामगार राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर गुलामगिरी करतायत!
शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी हे कामगार खासगी घरगडी बनलेत, आणि त्यांचा पगार मात्र जनतेच्या पैशातून होतोय.…