पुणे महापालिका २८ मे रोजी हज यात्रेकरुंसाठी राबविणार लसीकरण मोहिम
राज्य शासनाच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हज यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर, पोलिओ व इन्फ्लुएन्झा एच१ एन१ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या माहिमेत सुमारे १ हजार २०० हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २८ मे रोजी हज यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
शहरातून दरवर्षी शेकडो मुस्लीम बांधव हज यात्रेला जातात. हज यात्रेपूर्वी त्यांना अनेक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. या सोबत त्यांची वैद्यकीय तपासणी व लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना हज यात्रेची परवानगी मिळते. यंदाही शहरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार आहे.
हज यात्रेकरीता जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना मेंदूज्वर, पोलिओ आणि वय वर्षे ६५ वरील यात्रेकरूंसाठी मेंदूज्वर, पोलिओ व इन्फ्लुएन्झा एच१एन१ चे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हज यात्रेसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून करण्यात येत आहे.