संग्रहित छायाचित्र
पावसामुळे रस्त्यावर साठणारे पाणी, मेट्रोची रखडलेली कामे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. महापालिकेकडून तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. अशातच पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांच्या या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. स्पष्टवक्ते अशी ओळख असलेल्या अजित पवारांच्या तोंडून पुणेकरांचा संताप बाहेर पडल्याने अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. शनिवारी (दि. १४) वाहतूक विभागाच्या बैठकीत पवारांनी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे खापर अजित पवारांनी मेट्रोवर फोडले. पुणेकरांचा संताप उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या तोंडून व्यक्त झाला.
या बैठकीमध्ये अजित पवारांनी हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या अडथळ्यांचा उल्लेख करत परिसरातील राडारोडा हटवला नाही, तर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला १० कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी पुणे मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहेत. मात्र, याच कामांमुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे. अशातच पाऊस सुरू झाल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. मेट्रोचा राडारोडा चिखलात मिसळल्यामुळे रस्ते अधिकच खराब झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दिसत आहे.
पावसाळी लाईन बुजविल्या
मेट्रोकडून बहुतांश ठिकाणी पावसाळी लाईन बुजविण्यात आल्या आहे. पालिकेकडून वारंवार सूचना देऊनही या पावसाळी लाईनची स्वच्छता करण्यात न आल्याने रस्त्यावर पाणी साठताना दिसते. पावसाळी लाईनबद्दल मेट्रोने गांभीर्य न दाखविल्याने रस्त्यावर पाणी साठत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच, पुणे मेट्रो आणि पीएमआरडीएकडून नागरिकांच्या सोयीचा विचार न करता कामे केली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
महापालिका नाही गंभीर
शहरातील काही रस्त्यांवर पावसाळी लाईनच नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. एकीकडे सिमेंटचे रस्ते बांधले जात आहे. मात्र, रस्त्यांवर पावसाळी लाईन नसल्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होताना दिसत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावरील दुभाजकांवर पंक्चर करण्याबाबत मागील वर्षी ध्यानात आले असतानाही बहुतांश ठिकाणी दुभाजकांवर पंक्चर करण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच, ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांबाबतही पालिका कठोर भूमिका घेताना दिसत नाही. अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांवरील बांधकामांना पालिकेकडूनच परवानगी मिळाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहांना अडथळा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठते. महापालिकाच याबाबत गंभीर नसल्याची टीका नागरिक करीत आहेत.
पथविभागाचा संथ कारभार
पथविभाने आदर्श रस्ते तयार करण्याबाबत एक मॉडेल बनविले होते. मात्र दुसरीकडे ड्रेनेज, महावितरण, बड्या कंपन्यांच्या इंटरनेट केबल्स टाकण्यासाठी ठिकठिकाणी विभागाकडून खोदाईसाठी परवानगी देण्यात आली आहे. खोदाईनंतर त्या जागी तातडीने पुन्हा डांबरीकरण होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी पुन्हा डांबरीकरण झाले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी डबकी तयार होऊन पाणी साठते. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यातून पालिकेच्या आदर्श रस्ते मॉडेलचे पितळ उघडे पडल्याची टीका नागरिकांकडून होताना दिसत आहे.
पीएमआरडीए, मेट्रोकडून पालिकेच्या सूचनांचे पालन नाही?
शहरातील रस्ते, तसेच पावसाळी लाईन्सची दुरुस्ती-देखभाल, तसेच रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, पीएमआरडीए तसेच मेट्रोकडून शहराच्या गरजा लक्षात न घेता काम करण्यात येते. तसेच पालिकेच्या सूचनांचे पालन त्यांच्याकडून केले जात नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्याचे खापर मात्र पालिकेवर फुटते, असे काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना ‘सीविक मिरर’ला सांगितले.
शुक्रवारी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी पाणी साचले, तरी क्षेत्रीय कार्यालयनिहाय टीम तयार करून यंत्रणेद्वारे तातडीने कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी पावसाळी लाईनची व्यवस्था नसल्याने पाहणी करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका