पावसाळ्याला पुण्याचा नागरी सलाम!

अहो, पुणे! इथे दर पावसाळ्यात महत्त्वाकांक्षा इतक्या वेगाने बुडते, जशी डीपी रोडवर एखादी हॅचबॅक. आपले रस्ते नेहमीसारखे पुन्हा एकदा नद्यांमध्ये रूपांतरित झालेत, गाड्या अनिच्छेने पाणबुड्या बनल्या आहेत आणि प्रवास एक विनोदी शोकांतिका बनला आहे आणि ओढाताण नित्याची झाली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

प्रातिनिधिक छायाचित्र

करदात्यांच्या पैशातून महापालिकेतर्फे जलोत्सव, पुण्यनगरीतील रस्त्यांवरून प्रवास बनलाय विनोदी शोकांतिका

अहो, पुणे! इथे दर पावसाळ्यात महत्त्वाकांक्षा इतक्या वेगाने बुडते, जशी डीपी रोडवर एखादी हॅचबॅक. आपले रस्ते नेहमीसारखे पुन्हा एकदा नद्यांमध्ये रूपांतरित झालेत, गाड्या अनिच्छेने पाणबुड्या बनल्या आहेत आणि प्रवास एक विनोदी शोकांतिका बनला आहे आणि ओढाताण नित्याची झाली आहे. चिडून आणि हताश नजरेने गुडघाभर पाण्यातून वाट काढणारे पुणेकर ही दृश्यं आता ओळखीची वाटू लागली आहेत.. ही आता कधीतरी चुकून घडणारी घटना राहिलेली नसून, ती जणू नेहमीची परंपरा बनत चालली आहे. आपल्या स्वतःच्या, करदात्यांच्या पैशातून महापालिकेने आयोजित केलेला हा जणू 'जलोत्सव'! इथे प्रवेश सक्तीचा, अनुभव हमखास आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत काय?... तर आपल्या बिघडलेल्या गाड्या, बुडालेले ऑफिसचे दिवस, तब्येतीचे हाल... आणि हो, नेहमीचा अस्वस्थ करणारा प्रश्न, हे कधी तरी बदलणार आहे का?

जरा आठवा... गेल्या वर्षी आपण होतो त्याच पावसात, त्याच गटारात... एक दशकभर तेच घडतेय. कथा बदलत नाही. फक्त अजून वाईट होत चालली आहे. महापालिकेचं बजेट ऐका १० हजार कोटी! (तंतोतंत १२,६१८ कोटी रुपये). त्यातून आपल्याला काय मिळतं? जलमय रस्ते, इतके अनियोजित की अटलांटिस ह्यापेक्षा छान वाटावं, खड्डे जेव्हा राष्ट्रीय उद्यान वाटावं इतके खोल, आणि ‘प्री-मॉन्सून तयारी’ जी इतक्या लवकर गायब होते की वाटतं महापालिकेचे कर्मचारी ह्या तयारीसकट ‘एव्हॅपोरेट’ होत असावेत.

आपल्या नद्यांचंही ‘नागरी’ विसर्जन झालंय. मुळा, मुठा, आणि अंबील ओढा या नैसर्गिक जलवाहिन्यांचं शहराने ‘काँक्रीटिकरण’ केलंय. ह्या नद्यांनी शहराच्या प्रगतीच्या आड येण्याचा गुन्हा केला आणि आता त्यांनी सूड घ्यायचा निर्णय घेतलाय. जुलै-ऑगस्टमध्ये नदी नाही तुफान येतं आणि पावसाळ्याच्या एरवीच्या दिवसांत? तेच नदीपात्रं पुण्याचं अनधिकृत रॅली ट्रॅक बनतं! एसयूव्हीच्या चाचणीसाठी याहून चांगलं काय?

आता आपल्या ‘पाण्यात खेळणाऱ्या रॉयल्टी’कडे पाहू. जे लोक ‘फ्लड-प्रूफ अपार्टमेंट्स’साठी बिल्डरला गल्लाभर रक्कम देतात, तेच लोक दरवर्षी बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्याने त्यांच्या गाड्या पोहताना पाहतात. ट्रेझर पार्क ह्या ‘हाय-एंड’ सोसायटीची परिस्थिती बघा. नव्या जाहिरातींचं ब्रीदवाक्य काय असावं? "वॉटरफ्रंट व्ह्यू – गॅरंटेड! दर पावसाळ्यात."

जरा थांबा. मुंबई - २६ जुलै २००५. ९०० मिमी पाऊस, निम्मं शहर पाण्याखाली. कारण? रस्ते बुजले, नदी कोंडल्या आणि बिनदिक्कतपणे केलेला शहरविकास. हेच आपल्याकडेही होऊ शकतं. खरंच. फक्त एकदा डोळे उघडा. आपले ओढे, वाहिन्या, आणि नाल्यांची दशा बघा. दरवर्षी आपण आपत्तीला निमंत्रण देतोय, सन्मानपत्रासकट. अर्थात, आपला राग खऱ्या नायकांवर अजिबात नाही. ते म्हणजे अग्निशामक दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि पाण्यात गटार सफाई करणारे महापालिकेचे कर्मचारी. ते खऱ्या अर्थाने ही लढाई लढतात. पण निर्णय घेणारे? ह्या जलनाट्याचे लेखक? ते मात्र सुरक्षित आहेत... त्यांच्या एसीच्या गाड्यांमध्ये, पाण्याच्या थेंबाशिवाय, तोंडातून एकही शब्द न काढता.

म्हणूनच एक नवीन उपाय सुचतो... पुणेरी भाषेत! पुढच्या पावसाळ्यात, आदरणीय नगरसेवक, आमदार, आमच्या सर्व सन्माननीय नेत्यांनी त्यांच्या काफिल्यातून बाहेर पडावं आणि ‘जनतेचा पावसाळा’ अनुभवावा. डीपी रोडवर रिक्षा पकडून कार्यालयात जावं. कोथरूडमधल्या नव्या खड्ड्यांवरून स्वतः गाडी चालवावी. मग कळेल, काय दिव्य परिस्थिती आपण तयार केली आहे.

तोपर्यंत, पुणेकरांनो, नवीन जीवनशैली स्वीकारा. छत्र्या पुरेशा नाहीत.. आता जीवनजॅकेट घ्या. एखादी बोट शाळेच्या वेळेस उपयोगी ठरेल. कदाचित, 'अर्बन कयाकिंग लीग' सुरू करू या. नागरिकांना मिळालंय काय? पाणी, संताप आणि न थांबणारी उपहासाची लाट.

वीस पावसाळे गेले. आपण त्यातून धडा काही घेतला नाही. पाणी फक्त वाढतंय, नागरिक फक्त मनःस्ताप व्यक्त करतायत आणि महापालिकेचं फक्त दुर्लक्ष वाढत चाललंय. म्हणूनच, पुणेकरांनो, उपहासाची तलवार शस्रासारखी धारदार ठेवा. तुमचे लाइफजॅकेट तयार ठेवा. 'मनपाचं जलनाट्य' रंगात आलंय!

Share this story

Latest