पुणे सह आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली
पुणे : पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. राज्य शासनाने मंगळवारी याबाबतचे आदेश काढले. तर, नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभाग व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
संदीप कर्णिक यांची एप्रिल २०२२ मध्ये पुण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली होती. डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई या ठिकाणी बदली झाल्यानंतर कर्णिक यांची पुण्यामध्ये वर्णी लागलेली होती. कर्णिक यांनी यापूर्वी पुणे ग्रामीणचे अधीक्षक म्हणून देखील काम केलेले होते. तर, नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम केलेले होते.
त्यांची कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची बदली करण्यात आलेली होती. आता कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर शिंदे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त कोण याबाबत गुप्तता पाळली जात असून पुण्याच्या सह पोलीस आयुक्तांची नियुक्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.