संग्रहित छायाचित्र
पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे मिळकतधारकांना वेळेत कर भरता आला नाही. तसेच सवलतीने कर भरण्यासाठी नागरिकांकडून मुदतवाढीबाबत वारंवार मागणी होत आहे. संकेतस्थळाला आलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता शेवटच्या दिवशी अनेकांना कर भरता आला नाही. त्यामुळे नागरिकांना सवलतीने कर भरता येण्यासाठी पालिकेने १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मिळकतदारांना १५ जूनपर्यंत पाच ते दहा टक्के सवलतीसह मिळकतकर भरता येणार आहे. मिळकतधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या कर आकारणी विभागाने केले आहे.
पालिकेच्या मिळकतकर विभागाकडून मिळकतदारांना वेळेवर बिले मिळाली नसल्याने पाच ते दहा टक्क्याची सवलत मिळण्यापासून अनेकजण वंचित राहणार होते. त्यामुळे कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली होती. या वर्षी पालिकेने मिळकतकराची बिले पोस्टाद्वारे पाठविली आहे. तसेच पालिकेच्या मिळकतकर विभागाच्या
propertytax.punecorparation.org या संकेतस्थळावर बिले उपलब्ध करून दिली. पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेली मिळकतकराची बिले अद्याप मिळकतदारांना मिळाली नाही. संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक मिळकतदार बिल पाहू शकत नाही. तसेच अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याने संकेतस्थळावर माहिती मिळण्यात अडचणी येतात. या कारणांमुळे ही मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली गेली. पालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या मुदतीत (आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात) मिळकतकर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. अनेक मिळकतदारांना बिले वेळेत मिळाली नसल्याने ते ही सवलत घेण्यापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात घेत प्रशासनाने पंधरा दिवस मुदतवाढ दिली आहे.
पालिकेच्या मिळकतकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्याचे नियोजन केले आहे . पालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४.२२ लक्ष इतकी आहे. सर्व मिळकतधारकांना पोस्टातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षाची देयके पाठवण्यात आली आहेत. ज्या मिळकतधारकांना अद्याप देयके प्राप्त झाली नसतील , त्यांनी मिळकतकर विभागाच्या propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर देयक पाहू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात. पालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीय सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहेत. मिळकतकर संदर्भात कोणत्याही समस्या निवारणाकरिता १८०० १०३० २२२ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे