संग्रहित छायाचित्र
पुणे: नैसर्गिक आपत्तीवेळी मदत कार्याचे व्यवस्थापन करता यावे, संकटातील नागरिकांना मदत करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल पाचशे स्वयंसेवकांना अर्थात ‘आपदा मित्रांना’ बारा दिवसांचे प्रशिक्षण दिले होते. मात्र, सिंहगड रोडवरील पुरावेळी एकही ‘आपदा मित्र’ दिसला नसल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या ( एनडीएमए) आपत्ती मदत प्रकल्पात देशातील सात शहरांचा मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद, बंगलूरु, हैद्राबाद आणि पुणे या सात शहरांचा समावेश आहे. अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट ( युएफआरएम) प्रकल्पांतर्गत पुण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली जाते. प्रशिक्षणानंतर आपदा मित्राला तब्बल दहा हजारांचे किट दिले होते. या किटमध्ये लाईफ जॅकेट, प्रथमोपचार, रेस्क्यू उपकरणे आदींचा समावेश होता. पुरावेळी पालिका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन पथकाचा अभाव असल्याचेही दिसून आले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) प्रकल्पांत पुणे शहराचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने काही महिन्यापूर्वी तब्बल पाचशे आपदा मित्रांना बारा दिवसांचे प्रशिक्षण दिले. यामध्ये शोध व बचाव, प्रथमोपचार , रेस्क्यू करणे यासह पुरात वाहून जाणाऱ्यांना, बुडणाऱ्यांना वाचविण्याचे कौशल्य शिकवले गेले. यात पुणे शहरातील पन्नास आपदा मित्रांचा प्रशिक्षणात सहभाग होता. प्रत्येक आपदा मित्राला दहा हजार रूपयांचे किटसुद्धा दिले गेले. मात्र, गेल्या आठवड्यात सिंहगड रोड परिसरात उद्भवलेल्या पूरस्थितीत एकही आपदा मित्र दिसला नाहीत. त्यामुळे कोट्यावधी रूपये प्रशिक्षण घेऊन कागदी घोडे नाचविण्याचा हा प्रकार पुन्हा एकदा समोर दिसून आला आहे.
अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट ( युएमआरएम) प्रकल्पात पुणे शहरासाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गेली पाच वर्ष प्रत्येक वर्षांला पन्नास कोटी रूपयांचा निधी मिळत आहे. या निधीमधून महापालिकेने अल्प, दीर्घ मुदतीच्या स्ट्रक्चरल, नॉन स्ट्रक्चरल उपायोजना करणे अपेक्षित होते. यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर महापालिकेच्या स्तरावर पुणे शहर आपत्ती व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, ड्रेसकोड, रेस्क्यू उपकरणे, बोट असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात सेवकांची चौवीस तास नेमणूक करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पुणे महापालिकेतील विविध विभाग, खात्यातील सेवक, कर्मचारी यांच्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण, क्षमता व बांधणी आराखडा तयार करण्याचे नियोजन झाले नाही.
पुणे महापालिकेतील पन्नासजणांना ‘आपदा मित्र ’ म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यांच्यासह पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रिय कार्यरत आहे.
- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, पुणे महापालिका