संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) १७ ऑगस्टपासून प्रवाशांसाठी ‘ॲप्ली पीएमपीएमएल’ हे नवीन ‘मोबाईल ॲप्लिकेशन’ सुरू केले होते. ते आतापर्यंत जेमतेम ४० हजार जणांनीच कार्यान्वित (डाऊनलोड) करून घेतले आहे. मात्र, या ॲप्लिकेशनला अनेक मर्यादा असून, त्यामुळे तो प्रभावीपणे वापरता येत नसल्याच्या बहुसंख्य वापरकर्त्यांच्या तक्रारी आहेत.
हे ‘ॲप्लिकेशन’ एवढ्या प्रवाशांनी मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतल्यानंतरही आतापर्यंत अवघ्या ६० हजार रुपयांचीच उलाढाल झाली आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावी उपयोगितेविषयी प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. ‘ॲप्ली पीएमपीएमएल’ सुरू करण्यामागे पुण्याच्या या सार्वजनिक वाहतूक सेवेत ऑनलाईन सुसूत्रता आणण्याचा उद्देश आहे. या ‘ॲप्लिकेशन’द्वारे एखाद्या वेळी प्रवाशाला हवी असलेली बस नेमकी कुठे आहे, याची थेट ताजी माहिती मिळण्यास मदत होईल, बसमार्गांची आणि बसक्रमांकांची माहिती प्रवाशांना मिळावी, ‘ऑनलाईन’ तिकीट नोंदणी, ‘यूपीआय’द्वारे तिकीट रक्कम भरणे, तक्रार नोंदवणे आदी सेवा याद्वारे होऊ शकतात. त्याचप्रमाणे ‘पुणे मेट्रो’ची तिकिटेही याद्वारे देण्याचा उद्देशही आहे.
मात्र, या ‘ॲप्लिकेशन’च्या उपयोगाविषयी प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तेव्हा हे ते अपेक्षेनुसार काम करत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. बस नेमकी कुठे आहे, याची अद्ययावत माहिती (लाईव्ह लोकेशन) या ‘ॲप्लिकेशन’द्वारे नेमकेपणाने मिळत नसल्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आहे. बसचे नेमके ठिकाण समजू शकत नसल्याने प्रवाशांना हे ‘ॲप्लिकेशन’ असूनही आपल्या प्रवासाचे नेमके नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. ‘ऑनलाईन’ तिकीट नोंदणीबाबतही प्रवासी समाधानी नाहीत. ही नोंदणी करणे किचकट आणि सदोष पद्धतीने होते. त्यात अनेक चुका होत आहेत. त्यामुळे या ‘ॲप’द्वारे तिकीट नोंदणी व्यवहारात अनेक अडथळे,अडचणी येत असल्याने प्रवासी वैतागत आहेत.
या ‘ॲप्लिकेशन’चे वर्णन ते वापरण्यास सुलभ असेल असे केले गेले होते. मात्र, वापरकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार हे ‘ॲप’ वापरण्यास सुलभ-सोपे नाही. विशेषतः त्याद्वारे ‘पुणे मेट्रो’ची तिकिटे खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. तिकिट खरेदीतही अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांना सहजपणे आणि विनाअडथळा तिकीट खरेदी करण्यात अडचणी येत आहेत.
आपल्या तक्रारींवर-समस्यांवर समाधानकारक तोडगा मिळण्यास विलंब येत असल्याने वापरकर्ते या ‘ॲप’च्या कार्यक्षमतेबद्दल असमाधानी आहेत. या ॲपला व्यापक प्रतिसाद मिळाल्यास त्याला समर्थपणे तोंड देण्यास याला मर्यादा येत आहेत. एक प्रवासी नेहा कदम यांनी सांगितले की, मला तर असे ‘ॲप’ सुरू झाले आहे, याचीच कल्पना नव्हती. प्रशासनाने या ‘ॲप’ची पुण्यात सर्वदूर जाहिरात केली पाहिजे. जेणेकरून अधिकाधिक प्रवासी ते ‘आपल्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करू शकतील. बसच्या स्थितीविषयी अनेक प्रवासी नाराज असतात. जर हे ‘ॲप’ सुरू झाले आहे तर त्या माध्यमातून आम्ही नोंदवलेल्या तक्रारींवर समाधानकारक तोडगा पीएमपीएमल प्रशासन काढेल, अशी आशा आम्हाला वाटत आहे.
प्रकृती जैन या प्रवासी विद्यार्थिनीने सांगितले की, या ‘ॲप’द्वारे मेट्रो तिकिटेही खरेदी करता येतील, अशी जाहिरात हे ‘ॲप’ सुरू करण्यापूर्वी करण्यात आली होती. पण ही सेवा या ॲपवर सध्या तरी उपलब्ध नाही. हे ‘ॲप’ सर्व सेवा पुरवण्यात समर्थ झाल्यानंतरच सुरू करायला हवे होते. बसच्या दुरावस्थांकडे लक्ष देऊन त्यांची योग्य निगा राखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. तसेच या व अन्य समस्यांसाठी या ‘ॲप’द्वारे नोंदवलेल्या तक्रारींना प्रशासनाने त्वरित कृतिशील प्रतिसाद देण्याची गरज आहे. ‘पीएमपीएमएल’ बसच्या नियमित प्रवासी शोभा कानिटकर यांनी सांगितले की, याची कल्पना चांगली आहे. मात्र, सध्या तरी त्याच्या वापरात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. या ‘ॲप’द्वारे आपल्याला हव्या असलेल्या बसचा मागोवा नेमकेपणाने घेता येत नाही. त्यामुळे त्याच्या महत्त्वाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तिकीट रकमेचा भरणा करण्याची प्रक्रिया फारच मंद गतीने होत आहे. तिचा वेग वाढवणे नितांत गरजेचे आहे. या मर्यादांवर मात केल्यास हे ‘ॲप’ प्रवाशांसाठी सुविधाजनक ठरेल.
सकारात्मक प्रतिसाद : नार्वेकर
‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय सहसंचालक नितीन नार्वेकर यांनी या ‘ॲप’ ला प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा करून सांगितले की, याला कार्यान्वित करण्याचे आणि त्याद्वारे उलाढालीचे प्रमाण पाहता त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या बसच्या सेवा, त्यांचे वेळापत्रक, उपलब्धता आणि अन्य आवश्यक सेवा मिळवणे सोपे होणार आहे. आम्ही १३०० बसमध्ये मागोवा प्रणाली (ट्रॅकिंग सिस्टिम) बसवली आहे. आणखी ३०० बसमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या आठवड्याअखेरीस या ‘ॲप’द्वारे ‘मेट्रो’ची तिकिटेही खरेदी करता येतील. या विस्तारित सेवेमुळे अधिकाधिक प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर सहजपणे या सुविधा उपलब्ध होतील.