Advertisement

PMC Pune | काँक्रीटच्या रस्त्यांना बसणार लगाम? छोट्या रस्त्यांसाठी डांबरीकरणालाच प्राधान्य….

  • पाणी तुंबल्याने प्रशासनाचा बचावात्मक पवित्रा; सरसकट सर्वच रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या धोरणापासून महापालिकेचा यू-टर्न,
  • उशिरा का होईना पालिकेकडून वास्तवाची कबुली, डांबरीकरणाला प्राधान्य

पुणे : शहरातील अरुंद गल्लीबोळांमध्ये केलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे पाऊस पडल्यानंतर पाणी जमिनीत न मुरता रस्त्यावरून वाहू लागते. या रस्त्यांवरून वाढलेले वाहणारे पाणी तुंबण्याच्या समस्येमुळे शहर अगदी अर्ध्यातासाच्या पावसातच जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. या समस्येपुढे अखेर महापालिकेला गुडघे टेकल्याचे दिसते. कारण वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या धोरणाला ब्रेक लावत, नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर सिमेंट काँक्रिट न करण्याचा मोठा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी  जाहीर केला. त्यामुळे यापुढे छोट्या रस्त्यांसाठी डांबरीकरणालाच प्राधान्य यापुढे दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना याप्रकरणी तोंडी आदेश दिले आहेत. गेल्या दशकात ‘काँक्रीट म्हणजे टिकाऊ विकास’ या गृहितकावर शहरभर सिमेंट रस्त्यांचे जाळे उभारले गेले. मात्र, या रस्त्यांनी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता संपवली. परिणामी, मुसळधार पावसात रस्त्यांवर पाणी साचून ते थेट घरांमध्ये, दुकांनमध्ये आणि पार्किंगमध्ये घुसण्याच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणाच अर्थिक संकटाला सामोर जाव लागत असल्याचे भयान वास्तव गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे समोर आले आहे.  अनेक भागांत रस्तेच नाल्यांमध्ये परिवर्तित झाले, ही वस्तुस्थिती प्रशासनालाही नाकारता आली नाही.

शहरात सुमारे ९०० किलोमीटर लांबीचे सहा ते १२ मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळी गटारांची क्षमता अत्यल्प असून, जलनिस्सारणाची यंत्रणा निकृष्ट अवस्थेत आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडल्यास पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवरूनच वेगाने धावते आणि सखल वस्त्यांमध्ये घुसते. यंदाच्या अवकाळी पावसात अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यापार्श्वभूीमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
आता साडेसात ते १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यांवर केवळ डांबरीकरण केले जाईल, जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. वारंवार होणारे खोदकाम आणि ड्रेनेज लाईनच्या समस्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या आकडेवारीवरून शहरातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याचे स्पष्ट होते आणि नेमक्याच या रस्त्यांवर काँक्रीटचा अतिरेक झाला होता.

गल्लीबोळांतील रस्त्यांबाबत धोरणात्मक बदल करत साडेसात मीटरपर्यंतच्या रस्त्यांवर डांबरीकरणावर भर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात परिपत्रक काढण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना देण्यात आले आहेत. मात्र, हे आदेश प्रत्यक्षात कधी निघणार आणि कामे वेळेत पूर्ण होणार का, याबाबत पुणेकर साशंक आहेत.

कारण पावसाळा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. हवामानातील बदलामुळे पावसाचा पॅटर्न पूर्णपणे अनिश्चित झाला असून, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात ढगफुटीच्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये पाणी तुंबले, रस्ते जलमय झाले आणि घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीत धोरण जाहीर करण्यापलीकडे प्रत्यक्ष कामे कितपत वेगाने होतील, हा मुख्य प्रश्न आहे.

महापालिकेने डांबरीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी टेंडर प्रक्रिया, निधीची तरतूद, तांत्रिक मान्यता आणि प्रत्यक्ष कामाचा कालावधी या सर्व टप्प्यांना वेळ लागणार आहे. प्रशासनाच्या नेहमीच्या गतीचा विचार करता, पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण होणे कठीण असल्याचीच चर्चा आहे. नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “दरवर्षी पावसाळ्याच्या आधी अशा घोषणा होतात, पण प्रत्यक्षात कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. यंदाही तसंच होणार का?” असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात नव्हे तर उन्हाळ्यातही नागरिकांना सिमेंटच्या रस्त्यांचा त्रास

सिमेंट रस्ते असो की शहरात झालेलं काँक्रिटीकरण यामुळे शहरांमधली उष्णता वाढत चाललीय. काँक्रिटच्या बांधकामांमध्ये उष्णता शोषून ठेवण्याची क्षमता असते. काँक्रीट उष्णता शोषून ठेवत असल्याने ‘हीट आयलंड इफेक्ट’ अधिक तीव्र होतो. चॅटम हाऊसच्या  २०२० च्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी ४ अब्ज टनांहून अधिक सिमेंटचं उत्पादन केलं जातं.  सिमेंटमधून होणारं कार्बन उत्सर्जन हे जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या ८ टक्के आहे. त्यामुळे सिमेंटचं उत्पादन आणि त्याचा वापर हा जागतिक हवामान बदलाचा प्रमुख घटक समजला जातो.

महागडे काँक्रीट, स्वस्त डांबर  

सिमेंट काँक्रिट रस्त्यांचा खर्च डांबरी रस्त्यांच्या तुलनेत जास्त आहे. प्रति चौरस मीटर काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे ६ हजार रुपये खर्च येतो, तर डांबरी रस्त्यासाठी तो सुमारे ४ हजार ५०० रुपये आहे. खर्च जास्त, समस्या अधिक आणि देखभाल कठीण अशी स्थिती असूनही काँक्रीट रस्त्यांवरच भर देण्यात आल्याने संशय पुणेकरांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘टक्केवारी’चा आरोप पुन्हा चर्चेत

महापालिकेतील ‘स’ यादीतील निधीतून काँक्रीट रस्त्यांना मंजुरी देताना अधिक टक्केवारी मिळते, असा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे. कुठलाही रस्ता फक्त पृष्ठभाग बनवून होत नसतो. मीडियन, पृष्ठभाग, रस्त्याच्या बाजूला असणारी जागा, पाणी वाहून जाण्यासाठी गटारे आणि पायी चालण्यासाठी जागा या सगळ्या गोष्टी मिळून रस्ता तयार होतो. पण, आपल्याकडे सिमेंट रस्ते बनवताना इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त काँक्रिटचा पृष्ठभाग बनवला जातो.

नागरिकांच्या गरजांपेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य
रस्ता बनवताना पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित ड्रेनेज काढायला हवे. तसेच खराब झालेला रस्ता असेल तर तो पूर्ण खोदून जुना त्यातील ढिगारा बाहेर काढून जवळपास दोन ते अडीच फूट खोदून पुन्हा रेती, माती, गिट्टी टाकून दाब द्यायला हवा. त्यानंतर काँक्रिटचा पृष्ठभाग बनवायला हवा. पण, आपल्याकडे जुन्या रस्त्यांवरच सिमेंट पसरवून रस्ते बनवले जातात. त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरते. पण सर्व गोष्टींना आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येंना बगल देत राजकारणी लोकांकडून सिमेंटच्या रस्त्यांच्या घोषणा केल्या जातात. त्यामुळे नागरिकांच्या गरजांपेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य दिले गेले, अशी टीका आता उघडपणे होत आहे. काँक्रीट रस्त्यांना ब्रेक लावण्याचा निर्णय म्हणजे या दबक्या चर्चेची अप्रत्यक्ष कबुली असल्याचेही बोलले जात आहे.

पुण्याला  खोदकामाचा शाप; कोट्यवधींचा अपव्यय

शहरातील जलवाहिन्या, सांडपाणी लाईन्स, वीज व इंटरनेट केबलसाठी वारंवार खोदकाम करावे लागते. काँक्रीट रस्ते एकदा केल्यानंतर त्यांची पुन्हा दुरुस्ती करणे अत्यंत खर्चिक ठरते. अनेक ठिकाणी खोदकामानंतर रस्ते पूर्ववत होत नाहीत, परिणामी नव्याने केलेले रस्ते काही महिन्यांतच खराब होतात आणि कोट्यवधींचा निधी वाया जातो.

शहरातील रस्त्यांची वस्तुस्थिती

डांबरी रस्ते : ९०० किमी
काँक्रीट रस्ते : ४०० किमी
अविकसित रस्ते : १०० किमी
समाविष्ट गावांतील रस्ते : ७०० किमी

 रुंदीप्रमाणे रस्ते (किमीमध्ये)

१२ मीटरपेक्षा कमी : ९७०.८६
१२ ते २४ मीटर : ३१४
२४ ते ३० मीटर : ६०.५४
३० ते ३६ मीटर : २९.९६
३६ ते ६१ मीटर : २३.२९

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

PCMC | रिक्षा चालकांकडून नागरिकांची मनमानी लूट; ई-मीटर डावलून ओन्ली मीटरचा वापरुन सक्तीने भाडे वसुली...

Next Post

Nashik | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस