संग्रहित छायाचित्र
शहरांमधील रस्ते असोत की कचरापेट्या, उपनगरांची हद्द असो की महामार्ग, ग्रामीण भागाची शीव असो की उकिरडा सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांच्या प्रदूषणाचे साम्राज्य पसरलेले दिसते. प्लास्टिकबंदी असतानादेखील सर्रास या पिशव्या वापरल्या जातात आणि त्याची खुलेआम विक्री अन् वापर सुरू आहे. या प्लास्टिक पिशव्यांचा विपरित परिणाम दुभत्या जनावरांमध्ये दिसू लागला आहे. गाई, म्हशी, बैल, रेडे यांसारखी जनावरे चरताना प्लास्टिक पिशव्या खाल्ल्या जात असल्याने त्यांच्या पोटात हे प्लास्टिक जात आहे. त्यामुळे जनावरांची पोटं फुगू लागली असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनावरदेखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. पुणे जिल्ह्यात वर्षाकाठी अशा तब्बल २५० ते ३०० जनावरांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
यासंदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना पशुसंवर्धन आयुक्तालयामधील अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे म्हणाले, “लोक उघड्यावर प्लास्टिक पिशव्यात अन्न फेकतात. गाई, म्हशी यांसारखी गोवंशीय जनावरे त्या प्लास्टिक पिशव्या अन्नासकट खातात. शिवाय, ही भटकंती करणारी जनावरे रस्त्यावरील प्लास्टिकही अन्न समजून खातात. हे प्लास्टिक त्यांच्या पोटात साठत जाते.
गोवंशीय जनावरांच्या पोटात चार कप्पे असतात. त्यांनी खाल्लेले अन्न ८-१० तास त्यांच्या पोटात राहते. जेव्हा ही समस्या गंभीर होते, तेव्हा त्यांचे पोट फुगत जाते. तसेच, आतील भागाला सूजदेखील येते. जनावरे अन्न खाणे बंद करतात. प्रत्येक जनावरामध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात. अनेक जनावरांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सरासरी एका जनावराच्या पोटामधून अर्धा किलो ते दोन किलो प्लास्टिक आढळत असल्याचा आमचा निष्कर्ष आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेचा खर्च दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये एवढा येऊ शकतो. मात्र, आजार किती गुंतागुंतीचा आहे, त्यावरदेखील खर्च बदलू शकतो.’’
भटकी जनावरे नियमित अन्न न मिळाल्यामुळे जे काही मिळेल ते खातात. त्यांना अन्न आणि कचरा यातला फरक कळत नाही. लोकांनाही आपली जनावरे आजारी आहेत, याची जाणीव होत नाही. मात्र, रुग्णालयात नेऊन उपचार करणारे कोणी नसल्याने अनेकदा या जनावरांचा त्यामुळे मृत्यू होतो, अशी माहितीही मुकणे यांनी दिली.
सहायक आयुक्त डॉ. बी. एल. गायकवाड म्हणाले, “पुण्यासारख्या शहरांमध्ये अशी फारशी प्रकरणे समोर येत नाहीत, कारण बहुतांश जनावरे गोठ्यांतच असतात. मात्र, उपनगरांमध्ये आणि लहान गावांमध्ये अशी प्रकरणे अधिक आहेत. आम्ही पुणे जिल्ह्यात दरवर्षी २००-२५० शस्त्रक्रिया करतो, ज्यात जनावरांच्या पोटातून प्लास्टिकसह अन्य बाह्य वस्तू काढल्या जातात. जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत घातक गोष्ट आहे.”
याविषयी माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले, “गोवंशीय जनावरे ही रवंथ करणारी जनावरे असतात. त्यांनी खाल्लेलं अन्न ८-१० तास ते पोटात ठेवून रवंथ करून पचवतात. जेव्हा ते प्लास्टिक खातात, ते त्यांच्या पचनसंस्थेत साठते. ते पचत नाही आणि पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे अन्न साठवण्याची क्षमताही घटते. हे प्लास्टिक त्यांच्या मृत्यूपर्यंत किंवा शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांच्या शरीरात राहते. त्यामुळे दूध उत्पादन कमी होते. शिवाय, ही जनावरे सहज गर्भधारणा करू शकत नाहीत. शरीरात फॉस्फरसची कमतरता असली की, त्या अधिक प्रमाणात प्लास्टिक खातात.”
चाकणमधील शेतकरी साहेबराव पाटारे म्हणाले, “माझ्याकडे तीन म्हशी आणि दोन गाई आहेत. मी त्या दुसऱ्या एका शेतकऱ्याबरोबर चरण्यासाठी पाठवतो. गेल्या वर्षी माझ्या एका म्हशीला त्रास सुरू झाला. तिने खाणं बंद केलं आणि तिचं पोट प्रचंड सुजलं. मी तिला चाकण येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी १० किलो प्लास्टिक काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. आता ती ठीक आहे आणि दररोज दूध देते.”
‘त्या’ पिशव्या जनावरांच्या मृत्यूस कारणीभूत
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कमी उपयोगी आणि जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सिंगल-यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, आयात, साठवणूक, विक्री आणि वापर यावर बंदी आहे. तरीही असे प्लास्टिक तयार केले जाते, वापरले जाते आणि नंतर कचर्यात टाकले जाते, ज्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात.
अशी आहे समस्या...
-सर्वत्र प्लास्टिक पसरल्यामुळे जनावरे ते खातात आणि त्यामुळे आजारी पडतात.
-गाई, म्हशींच्या पोटात प्लास्टिक गेल्यास त्यांची दूध उत्पादन क्षमताही घटते.
-डॉक्टर जनावरांच्या पोटातून ५०० ग्रॅम ते दोन किलोपर्यंत प्लास्टिक काढतात.
-त्यांच्या गर्भधारणेवर विपरित परिणाम होतो. मात्र, शस्त्रक्रियेनंतर जनावरे पुन्हा गर्भधारणेसाठी सक्षम होतात.
शहरात प्लास्टिक प्रदूषण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आमचा सहकारनगरमध्ये गोठा आहे. या गोठ्यात साधारण दोनशेच्या आसपास जनावरे आहेत. यामधील बहुतांश जनावरे दुभती आहेत. पूर्वी आम्ही जनावरे बाहेर सोडली की चाऱ्यासोबत त्यांच्याकडून प्लास्टिक खाल्ले जायचे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या. त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील कराव्या लागत होत्या. त्यामुळे आम्ही आता जनावरांना बाहेर सोडणे बंद केले असून गोठ्यातच त्यांना खायला दिले जाते. - लोकेश जानगवळी, दुग्ध व्यावसायिक
हे करा:
१. भटक्या किंवा इतर जनावरांना योग्य आणि पौष्टिक अन्न द्या.
२. जनावरे आजारी असल्यास, विशेषतः पोट फुगल्यासारखे लक्षण आढळल्यास त्यांना त्वरित पशुवैद्यकांकडे घेऊन जा.
३. सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये संपर्क साधा. ते परवडणारे आणि विश्वासार्ह असतात.
हे टाळा:
१. प्लास्टिक पिशवीत अन्न भरून रस्त्यावर फेकू नका.
२. आजारी भटक्या जनावरांकडे दुर्लक्ष करू नका.
३. खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांवर प्राधान्य देऊ नका. सरकारी रुग्णालयांतील उपचार स्वस्त आणि प्रभावी असतात.