संग्रहित छायाचित्र
पुणे: पुणे मेट्रोने पिंपरी ते स्वारगेट (१७.५ किलोमीटर, १४ स्टेशन्स) आणि वनाझ ते रामवाडी (१४.५ किलोमीटर, १६ स्टेशन्स) असा ३३ किलोमीटरचा विस्तृत मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला आहे. सरासरी दीड लाख प्रवासी दररोज या सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, मेट्रोची वेळ सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत असल्याने रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना मेट्रोची सेवा अपुरी पडत असल्याचे समोर येत आहे.
रात्री ११ पर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याची मागणी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी कंपन्या तसेच अनेक कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे अशा वेळेस प्रवाशांना पीएमपीएमएल बस किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. खाजगी वाहनचालक याचा फायदा घेत प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे तक्रारीतून उघड झाले आहे. परिणामी, मेट्रोची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मेट्रो प्रशासनाची सकारात्मक भूमिका
मेट्रो प्रशासनाने या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याच्या शक्यतांचा विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वेळ वाढविण्याचा निर्णय घेतल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांसाठी दिलासा
मेट्रोची वेळ वाढविल्यास आयटी कंपन्यांमधील कर्मचारी तसेच रात्री उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवास सुलभ होईल. यामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. प्रशासनाने लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.
"मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे",
- हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, पुणे मेट्रो