देशभरात प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय मंत्री आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या गराड्यात अडकले. शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान, प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी गडकरी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतु, वाहतूक कोंडीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला.
गडकरी शनिवारी सकाळी शनिवार वाडा येथे पाहणीसाठी दाखल झाले होते. मात्र, गडकरी यांना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांना आपला पाहणी दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर गडकरी यांनी गाडीत बसूनच अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.
स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पोलिस आणि पालिका प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. यावेळी आमदार रासने यांनी गडकरी यांना यासंदर्भात निवेदनही दिले असून, गडकरी यांनी लवकरच या प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शनिवार वाडा ते स्वारगेट भुयारी मार्ग हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. त्यामुळे गडकरी यांच्याकडून हा पाहणी दौरा होणे खूप महत्वाचे होते.