पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णीं यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुणे महापालिका थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राम्हण महासंघाच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३३१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही नावे देण्याची मागणी केली होती.
दरम्यान आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीला मेधा कुलकर्णी यांनीदेखील हजेर लावली होती. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न उपस्थित केले असून या बैठकीमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा मुद्दा मांडण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे.
परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारच्या काळात शहरांसह अनेक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचेही नामांतर करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव प्रयागराजचं करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही दोन शहरांची नावे बदलली आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झालं आहे.
यासोबतच, मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने गतवर्षी मुंबई शहरातील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदल्याचा प्रस्तावास विधान परिषदेत मंजुरी दिली होती. त्यात मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर रेल्वे मार्गावरील 3 स्थानकांचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर, हा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आला.