गोळ्या झेलू, आरक्षण घेऊ!
पुणे: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण (Maratha Reservation) घेणार आणि यात कोणी आडवा आला तर त्याला सोडणार नाही. वेळ प्रसंगी छातीवर गोळ्या झेलीन, पण आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी फिरणार नाही, असा निश्चय मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बुधवारी पुण्यात व्यक्त केला. तसेच मुंबईत आंदोलनावेळी कोणा आंदोलकाला त्रास दिला तर महाराष्ट्र, मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा रस्त्यावर उतरतील, इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. (Latest News Pune)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचा मोर्चा मुंबईला निघाला आहे. जरांगे पाटील पुण्यात येणार असल्याने त्या्ंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. जिकडे पाहावे तिकडे नुसते भगवे वादळच दिसून येत होते. कडक थंडीही मराठा समाज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आसुसला होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येत होते. जरांगे पाटील पुण्यात येताना त्यांची पहाटे भव्य सभा झाली, यासभेला लक्षणीय गर्दी होती. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मोर्चाला वाघोली येथून सुरुवात झाली. त्यावेळी वडगावशेरी फाट्यावर मोर्चात सहभागी आंदोलकांशी जरांगे पाटलांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. मोर्चामध्ये खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, लोहगाव, विमान नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. जरांगे पाटलांच्या स्वागताकरिता संपूर्ण नगर रस्ता परिसरात जागोजागी स्वागत कक्ष उभारले होते. रांगोळी, पताका, फुलांचे हार, फुलांची उधळण, फटाके, डीजेचे संगीत याद्वारे पाटलांचे स्वागत करण्यात आले.
जरांगे पाटील खराडीत मुक्कामी होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. सकाळी पदयात्रेला सुरवता होणार असल्याने मराठा बांधव लवकरच रस्त्यावर आले होते. त्यामुळे हा परिसर अवघा भगवामय झाला होता. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण घेतल्या शिवाय आता माघार नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. असे असताना देखील मोर्चा अतिशय शिस्तीने पुढे जात होता.
समर्थकांसह हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने नगर रस्ता वाघोली ते येरवडा पर्यंत जाम झाला होता. सकाळी साडेनऊ वाजता खराडीतून निघाल्यानंतर चंदननगर येथे येण्यासाठी तीन किलोमीटरच्या अंतरांसाठी मोर्चाला चार तास लागले. सायंकाळी चार वाजता मोर्चा वडगाव शेरी येथील रामवाडी परिसरात पोहोचला. त्यानंतर जुना पुणे -मुंबई महामार्गाने पुढे मार्गस्थ झाला.
जरांगे पाटील यांचा मोर्चा जाणार असल्याने वाहतूकीवर ताण वाढणार होता. त्यामुळे वाहतूक पोलीसांनी आधीच नियोजन केले होते. त्यानुसार नगर रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात आला होता. जरांगे यांच्या पदयात्रेचा पुणे शहरातील मार्ग नगर रस्ता, येरवडा, सादलबाबा चौक, संगमवाडी पूल, संचेती चौक, वेधशाळा चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध असा निश्चित करण्यात आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास पदयात्रेतील सहभागी झालेल्या मराठा बांधवाचा पहिला जथ्था संचेती चौकात दाखल झाला. त्यानंतर या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
नगर रस्ता १२ तास बंद
जरांगे पाटील यांचा मोर्चा नगर रस्त्यावरुन जाणार असल्याने वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी हा रस्ता तब्बल १२ तास वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यावरील पीएमपी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच रिक्षा सेवाही बंद होती. त्यामुळे वडगावशेरी, खराडी, साईनाथनगर, आनंदपार्क, शुभम सोसायटी या भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
कर्मचाऱ्यांनी घेतली सुट्टी...
मोर्चामुळे वाहतूक वळविण्यात आली होती. तसेच मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणावरुन मराठा येथील याचा अंदाज होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज पुणेकरांनी बांधला. नगर रस्त्यावरील वाहतूक सकाळी सातनंतर बंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील शासकीय कर्मचारी, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सुट्टी घेणे पसंत केले. नगर रस्ता परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुना मुंढवा पूलमार्गे वाहतूक वळविण्यात आली. टाटा गार्डन, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरीतील अंतर्गत रस्ते सुरू ठेवण्यात आले होते. मात्र गर्दीमुळे एकूणच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. गणेशखिंड रस्त्यासह उपरस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागला.
आयटी कंपन्यांची सुट्टी
नगर रस्त्यावरून मोर्चा जाणार असल्याने वाहतूक बंद राहणार होती. तसेच मोर्चात दिवस जाणार होता. त्यामुळे या रस्त्यावरील निको गार्डन, फिनिक्स मॉल, विमाननगर, टाटागार्डन आदी परिसरातील खासगी कंपन्या, आयटी कंपन्यांनी बुधवारी सुट्टी घेतल्याचे दिसून आले.
पोलीस छावणीचे स्वरुप
जरांगे पाटील यांचा मोर्चा ज्या मार्गावरुन जाणार होता. त्या मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच शहरातही मुख्य चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मोर्चाच्या मार्गावर तब्बल एक हजार पोलीस तैनात केले होते. दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली होती. नगर रस्ता ते ओैंध येथील राजीव गांधी पुलादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
प्रवाशांचे हाल...
नगर रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यावरील पीएमपी बससेवा बंद ठेवली होती. तसेच रिक्षा सेवाही बंद होती. त्यामुळे वडगावशेरी, खराडी, साईनाथनगर, आनंदपार्क, शुभम सोसायटी या भागातील प्रवाशांची गैरसोय झाली.