मांजरी भागात पतीने कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करीत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उज्वला नागनाथ वारुळे (वय ४०) आणि नागनाथ वसंत वारुळे (वय ४२, मुळ रा. रायखेल, ता.तुळजापूर, धाराशिव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार वैजिनाथ श्रीधर केदार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ वारुळे हा आंब्याची बाग भाड्याने घेऊन आंबे विक्रीचा व्यवसाय करीत होता. भावाने बोलवल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून तो कामानिमित्त ते पुण्यात राहण्यास आले होते. ते राहत असलेल्या इमारतीत सध्या काम सूरू होते. शेजारी काही त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नागनाथ वारुळे याने आपल्या पत्नीचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली असल्याने नेमके कारण समजू शकले नाही. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी मिळून आलेली नाही. या बाबत मृतांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एस बागल तपास करत आहे.