२० वर्षीय तरुणाचा राहत्या घरात गळफास
लोणी काळभोर येथे एका २० वर्षीय तरुणाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरातील साठे वस्तीमध्ये रविवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सुदर्शन ज्ञानेश्वर (माऊली) काळभोर (वय २०, रा. साठेवस्ती, तारा सिटी, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली काळभोर व त्यांची पत्नी रविवारी एका लग्न कार्यालासाठी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाहेरगावी गेले होते. यावेळी सुदर्शनने राहत्या घराला आतून कडी लावून घेतली. त्यानंतर घराच्या खाली काही विक्रेत्यांनी घराचा दरवाजा वाजवला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. तसेच फोन हि केले मात्र सुदर्शनने फोन उचलला नाही.
याबाबत सुदर्शनच्या आई-वडीलांना माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास सुदर्शनचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी पोलीसांशी संपर्क साधला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडल्यानंतर प्रकार उघडकीस आला. मात्र, सुदर्शनच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.