लक्ष्मण हाके यांचा वैद्यकीय चाचणी प्राथमिक अहवालात 'तथ्य' आले समोर
पुणे: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पुण्यात मद्यप्राशन करताना आढळून आले, असा आरोप करत सोमवारी (ता. ३०) रात्री मराठा आंदोलनकांनी त्यांना घेराव घातला होता. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. दरम्यान, लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी दारु पिलेली नव्हती, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे.
त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात. मात्र, लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी २० ते २५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे मराठा आंदोलकांनी मागणी करूनही पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सातत्याने उफाळून येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केलाय. त्यामुळे दोन्ही समाजाचे लोक आमने-सामने येत आहेत. सोमवारी लक्ष्मण हाके पुण्यात आले असता त्यांनी मद्यपान केल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला.
हाकेंना जाब विचारत मराठा आंदोलकांनी 'एक मराठा लाख मराठा' तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
दरम्यान, "मी कोणतीही टेस्ट करायला तयार आहे. मी मद्यप्राशन केलेलं नाही. मी दारू पिलोय, असा आरोप करून कोणी ओबीसीचा आवाज दडपू शकत नाही. मी माझी चळवळ माझं काम सुरूच ठेवणार आहे", असं लक्ष्मण हाके म्हणाले.
मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी तक्रार लक्ष्मण हाके यांनी कोंढवा पोलिसांत दिली. दुसरीकडे हाके यांनी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी २० ते २५ मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी दारु पिलेली नव्हती, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.