पुणेकरांचा जीव टांगणीला

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल पडल्याच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. असे असताना शहरातील जुन्या पुलांचे, कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीअभावी रखडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

शहरातील जुन्या पुलांचे, कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया तज्ज्ञ सल्लागार नियुक्ती अभावी रखडली

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल पडल्याच्या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. असे असताना शहरातील जुन्या पुलांचे, कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीअभावी रखडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. एरवी लोकहितपेक्षा कंत्राटदाराच्या फायद्याच्या कामांना प्राधान्य देणारी पालिका यावेळी मागे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

महापालिकेने यापूर्वी मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर अकरा पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शहरात गेल्या काही वर्षांपासून पाऊस पडण्याच्या प्रकारात मोठा बदल झाला आहे. थोड्या वेळासाठी जरी पाऊस झाला, तरी शहरातील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे पुणे शहरातील पूल आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे पुणेकरांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. मात्र, हा विषय अद्याप तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यावरच अडकून पडला असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी पालिकेने शहरातील इतर पूल आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुमारे साडेसहाशे पूल आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.  या निविदा प्रक्रियेत तीन संस्थांनी सहभाग घेतला आहे. हे काम पाच वर्षांच्या मुदतीचे आहे. पहिल्या वर्षात सर्व पूल आणि कल्व्हर्टची तपासणी करून अहवाल सादर करायचा आहे, त्यानंतर दरवर्षी याच पद्धतीने अहवाल तज्ज्ञ सल्लागारामार्फत पालिकेला दिला जाईल, अशी माहिती प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

अद्याप ६६२ पुलांची दुरुस्ती बाकी

पालिकेने वीस वर्षांहून अधिक जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले. त्यानुसार वि. भा. पाटील पुल (बोपोडी), एस. एम. जोशी पूल (नवी पेठ), वीर सावरकर पूल (कर्वे रस्ता), राजीव गांधी पूल (औंध), कात्रज-कोंढवा रस्ता (कात्रज गावठाण), न्यू संगम ब्रीज आणि आगाखान ब्रीज (कल्याणीनगर) या पुलांची कामे पूर्ण होत आली आहे.

पुलांच्या कामांसाठी २७ कोटींची आवश्यकता असताना १० कोटींचीच तरतूद

शहरातून मुळा आणि मुठा या दोन मोठ्या नद्या, राम नदी तसेच आंबिल ओढा, माणिक नाला, भैराेबा नाला, नागझरी आदी मोठे ओढेही आहेत. या नदी आणि ओढ्यांवर पुलांची उभारणी केली गेली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे स्वरूप बदलले आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना घडत आहे.  पालिकेच्या भवन विभागाने यापूर्वी शहरातील मोठ्या ९८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यापैकी ३८ पुलांच्या कामांमध्ये ११ पुलांचे काम करण्यास प्राधान्य देण्यात आले. यानुसार या पुलांच्या दुरुस्तीची कामे केली गेली आहे. यामध्ये प्रामुख्याने बेअरिंग बदलणे, एक्सपान्शन जाॅईंट बदलणे आदी कामे केली झाली आहेत. या अकरा पुलांव्यतिरिक्त आणखी २७ पुलांच्या कामांसाठी २७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी यावर्षीच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. त्यांची कामे केली जाणार आहेत.

 

शहरात चारशेहून अधिक बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यासंदर्भात बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील २१ धोकादायक इमारती, वाडे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. -  नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

Share this story

Latest