संग्रहित छायाचित्र
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. इंदापुरातील महाविद्यालयासमोरच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
ही घटना सोमवारी (३० सप्टेंबर) संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल अशोक चव्हाण (वय २५, रा. शिरसोडी, ता. इंदापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बारामतीमध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलाचा त्याच्याच वर्गमित्रांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडल्यानंतर इंदापुरात गोळीबार झाल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
सोमवारी संध्याकाळी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधाराचा फायदा घेत इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच चव्हाणवर गोळ्या झाडण्यात आल्या. धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले (रा. शिरसोडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी वालचंदनगरमधून ताब्यात घेतले.
जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. गोळीबार घडल्यानंतर इंदापूर पोलिसांनी तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात जागोजागी नाकाबंदी केली. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाकाबंदी दरम्यान आरोपीला दोन तासांतच ताब्यात घेतले. त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.