पुणे : बिल्डरविरुद्ध रहिवासी मैदानात
वडगाव शेरीतील कुमार कृती सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळ सायबेज या आयटी कंपनीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम साइटवर प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप या सोसायटीतील नागरिकांचा आहे. बिल्डर आणि सायबेज कंपनीविरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार करूनही या प्रकरणात काहीच कारवाई न झाल्यामुळे संतापलेले रहिवासी आता बिल्डर आणि सायबेज कंपनीविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
कुमार बिल्डर्सने जी जागा ‘सायबेज’ला विकली, ती बिगर रहिवासी कामांसाठी देणार नसल्याचे कुमार कृती सोसायटीच्या रहिवाशांना सांगितले होते. मात्र, बिल्डरने आपले आश्वासन न पाळले नाही. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. कुमार कृती सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी आपल्या सोसायटीच्या बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कुल नॉव्हेल हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड (कुमार बिल्डर्स) तसेच सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड यांचा यात समावेश आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये एमपीसीबीने सायबेज सॉफ्टवेअर प्रायव्हेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीला वडगाव शेरी परिसरात नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान पर्यावरण उल्लंघनाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या संदर्भात ‘पुणे टाइम्स मिरर’ने १८ ऑक्टोबरच्या अंकात सविस्तर वृत्त दिले होते.
रहिवाशांनी येथे सुरू असलेल्या बांधकामामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. तक्रारींचे निराकरण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल एमपीसीबीने सायबेजविरुद्ध कायदेशीर कारवाईचा प्रारंभिक इशारा दिला. मात्र, प्रत्यक्षात कारवाईसाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. यामुळे रहिवाशांचा अपेक्षाभंग झाला. अखेर बांधकामामुळे होत असलेल्या वायू आणि ध्वनिप्रदूषणाला वैतागून कुमार कृती सोसायटीच्या रहिवाशांनी बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला.
पोलीस, महापालिकेच्या वरिष्ठांकडे
तक्रार करूनही कारवाई नाही
एमपीसीबीकडून कारवाई होत नसल्याने निराश झालेल्या रहिवाशांनी हे प्रकरण स्वत:च्या हातात घेतले. १० वर्षांखालील अंदाजे ५० टक्के मुले आणि २५ टक्के ज्येष्ठ नागरिकांसह दोन हजाराहून अधिक रहिवासी अनेक महिन्यांपासून प्रदूषण आणि त्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांचा सामना करत आहेत. या रहिवाशांनी पुणे पोलीस आणि पुणे महापालिकेच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रहिवाशांनी एकजूट दाखवत सायबेज सॉफ्टवेअर कंपनीने सुरू असलेल्या बांधकामाशी संबंधित बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
रहिवाशांनी यापूर्वी ५ जुलै आणि ७ ऑगस्ट रोजी सायबेजला पत्र पाठवून प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी उपायांची विनंती करण्यासह या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. तथापि, हे प्रयत्न अनुत्तरित आहेत.
सायबेज म्हणते, आमच्याकडे परवानगी
एमपीसीबीने सुरुवातीला कठोर अटी घालत सायबेजला १२ जुलै रोजी पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने बांधकामासाठी संमती दिली होती. तथापि १२ ऑगस्ट आणि १० ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासणीत चिंताजनक विसंगती आढळून आली. ही बाब रहिवाशांनी ध्यानात आणून देऊनही एमपीसीबीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
बांधकामामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनिप्रदूषणाबाबत रहिवाशांनी गंभीर तक्रारी केल्या. सायबेजने पर्यावरणीय नियमांचे पालन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप कुमार कृती सोसायटीच्या रहिवाशांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला. दुसरीकडे, सायबेजच्या प्रतिनिधीने सांगितले की त्यांच्याकडे ब्लास्टिंगसाठी आवश्यक परवानग्या आहेत. शिवाय ते एमपीसीबीला देण्यासाठी उत्तर तयार करत आहेत.
‘सीविक मिरर’ने संपर्क साधला असता सायबेज सॉफ्टवेअरचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयकृष्णन के. यांनी एमपीसीबीकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्याचे मान्य केले. “आमच्याकडे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत ब्लास्टिंगची आवश्यक परवानगी आहे. तेथील भागात असलेले पावसाचे पाणी नाल्यात परत जात आहे. आम्ही करत असलेल्या उत्खननामुळे कोणताही द्रव कचरा निर्माण होत नाही,’’ असा दावा त्यांनी केला.
रहिवाशांचे होताहेत हाल
या प्रकरणी एमपीसीबीकडून कारवाई होत नसल्याबद्दल कुमार कृती सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील हुमणे यांनी ‘सीविक मिरर’नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘एमपीसीबीने सायबेजवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पहाटे आणि संध्याकाळी उशिरा सुरू असलेल्या बांधकामामुळे जास्त आवाज होत आहे. याचा आम्हाला मोठा त्रास होत आहे. कंपनी या परिस्थितीबद्दल खोटी माहिती देत आहे. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः साइटची तपासणी केली. त्यामुळे त्यांच्या निष्कर्षांमध्ये कोणतीही त्रुटी असू शकत नाही. पुढील कारवाई न केल्यास, रहिवाशांना त्यांचे हक्क आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलण्याशिवाय पर्याय राहणार नाही.’’
“अधिकारी मदतीसाठी पुढे येत नाहीत हे अत्यंत निराशाजनक आहे. रहिवाशांना त्रास होत आहे आणि आम्हाला शंका आहे की ‘सायबेज’ची बांधकाम साइट आवाज आणि हवा गुणवत्ता नियंत्रणाबाबत आवश्यक पर्यावरणीय नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे आता आम्ही व्यावसायिक वापरासाठी निवासी मालमत्ता विकण्यासाठी बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे,” अशी माहिती सोसायटीचे खजिनदार सुधांशू सिंग यांनी दिली.
‘सायबेज’वर असंवेदनशीलतेचा आरोप
सोसायटीचे सदस्य सुकेत जैन यांनी बांधकामाच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सायबेज सॉफ्टवेअर कंपनी आमच्या सोसायटीजवळ बांधकाम करत आहे आणि एक अंतर्गत रस्ता वापरत आहे. आम्ही रहिवासी दैनंदिन ये-जा करण्यासाठी या रस्त्यावर अवलंबून आहेत. या बांधकामामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. जास्त आवाज, धूळ, कंपने यामुळे सोसायटीच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. सोसायटीच्या बांधकामापासून रहिवाशांच्या वापरात असलेला १८ मीटरचा अंतर्गत रस्ता आता बांधकाम वाहनांकडून बेकायदेशीरपणे वापरला जात आहे. ब्लास्टिंगवेळी होत असलेल्या कंपनांमुळे रस्ता, ड्रेनेज सिस्टीम यासह सोसायटीच्या इमारती आणि कंपाऊंड भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.’’
“आम्ही रहिवाशांनी सायबेजला पत्रे पाठवून प्रदूषण आणि नुकसान कमी करण्यासाठी कारवाईची विनंती केली. या समस्यांचे निराकरण करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. एवढे प्रयत्न करूनही आमचे प्रश्न सुटलेले नाहीत,” असे कुमार कृतीचे सचिव सत्यवान रावत यांनी सांगितले.
कुमार कृतीमधील रहिवासी मुनीर वस्तानी यांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या, ते म्हणाले, ‘‘बांधकाम पूर्ण प्रमाणात सुरू आहे, आणि रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत आहे. एमपीसीबीने या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. बांधकामाच्या आवाजाची पातळीदेखील ८० ते ९० डेसिबलपेक्षा जास्त आहे. या संदर्भात आम्ही कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.’’
या संदर्भात ‘कुमार बिल्डर्स’ची बाजू जाणून घेण्यासाठी ‘सीविक मिरर’ने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध नव्हते.